छत्रपती संभाजीनगर: शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जापानी ‘मियाझाकी’ आंब्याचे झाड लावले आहे. यंदा ते झाड आंब्यांनी लगडले आहे. मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलोपर्यंत असल्याचे सांगितले जाते. परंतु एवढी किंमत भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात मिळणे अशक्य असल्याची वस्तुस्थिती प्रयोगशील शेतकरी कल्याण बाबासाहेब दाभाडे यांना असून, तरीही हापूसपेक्षा कितीतरी अधिक पटीने किंमत मिळेल, अशी त्यांना आशा आहे. मूळ जापानी मियाझाकी या एका आंब्याचे वजन ९०० ग्रॅमपर्यंत असते.
मात्र, दाभाडे यांच्या शेतातील मियाझाकी आंब्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंतचे आहे. १५ ते २० फूट उंच वाढलेल्या या झाडाचा व्यासही १० फुटाच्या आसपास आहे.
सध्या या झाडाला शंभरपेक्षा अधिक मियाझाकी आंबे लगडल्याची माहिती कल्याण दाभाडे यांनी दिली. आंब्याच्या लागवडीपासून ते आत्ताच्या लगडल्यापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी आपल्याला एका मित्राने मियाझाकी हे आंब्याचे रोप दिले. आपली शेतीतील प्रयोगशीलता पाहून आपण डाळिंबाच्या तेल्या रोगावरही प्रयोग केले असून, जैविक पद्धतीने त्यावर उपाय शोधला आहे.
१५ वर्षे प्रत्यक्ष शेती केल्यानंतर रीतसर शेतीतील काही शिक्षण घेतले. बीएसस्सीचा पदवीधर झालो. शेतीत जिवाणूू तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतले. मियाझाकी आंब्याची किंमत दोन ते अडीच लाखांची असल्याचे सांगितले जाते. आपल्याला किमतीचा अंदाज नाही. परंतु विक्रीच्या दृष्टीने विचार केल्यास किंमत नक्कीच हापूसपेक्षा कितीतरी पटीने अधिक येईल, असे दाभाडे यांनी सांगितले.