लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाचे काचेचे प्रवेशद्वार व पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे वाहन विटकर मारून फोडल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. विशाल म्हस्के नावाच्या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. विशालने काही भूमाफियांकडून होणाऱ्या त्रासाच्या तक्रारीची नोंद घेतली जात नसल्याच्या कारणातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल याला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासमोर उभे केले. त्याने पोलीस आयुक्तांना काही भूमाफियाकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदवाडी परिसरात काही भूमाफिया एन-ए ४५ चे एन-ए- ४४ करून देतो म्हणून तगादा लावत असून त्यांनी एकप्रकारे छळणे सुरू केले. अक्षरश: घराच्या बाहेर पडणेही मुश्किल केले असून या प्रकाराला वैतागून विशालने अखेर बुधवारी मुकुंदवाडी पोलीस ठाणे तक्रार नोंदवण्यासाठी गाठले. तेथे दोन तास बसवून घेण्यात आले.

आणखी वाचा-भाजपच्या मतदारसंघात अजित पवारांची बांधणी, सतीश चव्हाणांना बळ देण्यावर भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यानंतरही तक्रार घेण्यात आली नसल्यामुळे विशालने गुरुवारी पोलीस आयुक्तालय गाठले. तेथे जाताना पिशवीत दोन विटकरीचे तुकडे घेतले. तक्रार घेतली नाही तर काचा फोडायच्या, असा टोकाचा विचार त्याने केला. तेथेही आणलेल्या मुद्रांकशुल्काशी संबंधित तक्रार घेतली नसल्याच्या रागातून विशालने आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील काच व तेथेच उभी असलेल्या पोलीस आयुक्तांच्या वाहनाची डाव्या बाजूची समोरची काच फोडली. याप्रकरणी विशालला ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.