घरातील अभियांत्रिकीची परीक्षा

घरात अभियांत्रिकीचा पेपर सोडवताना आढळून आलेले २४ विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, नगरसेवक सुरे अशा ३० जणांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर तीन विद्यार्थिनींची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याने सुटका करण्यात आली आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक दुपापर्यंत झाली नव्हती. कुलगुरू सध्या दिल्ली येथे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात सामूहिक कॉपी केली त्यांनीच अन्य विषयांमध्येही अशीच उत्तरे मागावून लिहिली आहेत का, याची तपासणी तज्ज्ञांमार्फत केली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे दिगंबर नेटके यांनी सांगितले. चौका येथे असलेल्या श्री साई इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या स्थापत्य शाखेच्या दुसऱ्या वर्षांतील २४ विद्यार्थी व ३ विद्यार्थिनींना शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या हर्सूल भागातील सुरेवाडी येथील घरामध्ये पेपर सोडवताना मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून पकडले होते. हे महाविद्यालय चालवणारे अ‍ॅड. गंगाधर मुंडे, मंगेश मुंडे, प्राचार्य संतोष देशमुख, प्रा. विजय आंधळे, अमित कांबळे यांनाही ताब्यात घेऊन बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. सामूहिक कॉपी करताना पुस्तक आदी साहित्य, मोबाईल, रोख ४० हजार असा २ लाख ९८ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता. सर्व आरोपींची बुधवारी मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी दिली. सर्व आरोपींना गुरुवारी दुपारी तीन वाजता मोठय़ा फौजफाटय़ासह न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात विद्यार्थ्यांच्या पालकांसह वकील, मित्र, नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. न्यायालयाने २३ मे पर्यंत ३० जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर तीन विद्यार्थिनींची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाकडून अभियांत्रिकीची परीक्षा घेतली जाणाऱ्या २८ केंद्रांमधून उत्तरपत्रिका आणण्यासाठी सरासरी २ किंवा ३ दिवसांचा अवधी केवळ गाडय़ा नसल्यामुळे दिला जातो. आज प्राचार्य आणि संबंधित महाविद्यालयाने त्यांच्याकडील सर्व उत्तरपत्रिका तातडीने जमा कराव्यात अशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहे. अजूनही साई अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ तारखेनंतर झालेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे सुपूर्द झालेल्या नव्हत्या. यंत्रणांमध्ये अनेक प्रकारचे दोष असल्याचे अधिकारीही मान्य करतात. दरम्यान याप्रकरणाचा सविस्तर अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडून मागवून घेतला जाईल, असे तंत्रशिक्षण विभागाचे डॉ. महेश शिवणकर यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रातही खळबळ

विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपी प्रकरणाच्या घटनेमुळे उद्योग क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून या पद्धतीने उत्तीर्ण झालेले अभियंते आमच्या उद्योगात काम करण्यासाठी येणार असतील तर कसा टिकाव धरायचा, असा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया सीआयआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.