सिमला येथे फिरावयास गेलेल्या पश्चिम बंगालमधील महिलेशी गाडीचालकाने गैरवर्तन केले. या बाबत या महिलेने व्हॉट्स अॅपवर थेट औरंगाबाद पोलिसांत तक्रार करून मदतीची विनंती केली. यानंतर औरंगाबाद पोलिसांनी तत्परतेने सिमला पोलिसांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. सिमला पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत कारवाई केल्यामुळे या महिलेने औरंगाबाद पोलिसांचे व्हॉट्स अॅपवरच मेसेज पाठवून आभार मानले. सोशल मीडियातून पोलिसांकडे केलेल्या मदतीच्या आवाहनाचा अडचणीत आलेल्यांना तत्पर उपयोग होऊ शकतो, हेच यातून सिद्ध झाले.
गुरुवारी सिमला येथून या महिलेने औरंगाबाद पोलीस आयुक्तालयास ८३९००२२२२२ या व्हऑट्स अॅप क्रमांकावर तक्रार पाठविली. मी पश्चिम बंगालमधील महिला असून सिमला येथे फिरावयास आले आहे. तेथे फिरण्यासाठी आम्ही गाडी केली होती. मात्र, गाडीच्या चालकाने आमच्याशी गैरवर्तन केले व अपशब्द वापरले, असे महिलेने तक्रारीत म्हटले. या प्रकारामुळे ही महिला, तसेच तिच्यासोबत असलेले घाबरून गेले होते. कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, याची काही माहिती नसतानाच या महिलेने येथे नमूद व्हॉट्स अॅप क्रमांकावर ही तक्रार पाठवून लक्ष वेधले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे व सहायक आयुक्त (गुन्हे) खुशालचंद बाहेती यांना ही माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तोडकर यांनी सिमला येथे असलेल्या या महिलेशी संपर्क साधला व प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेतली. यानंतर सिमला पोलिसांशी संपर्क साधून येथे आलेली तक्रार त्यांच्याकडे पोहोचवली. सिमला पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली. पोलिसांच्या या समयसूचकतेबद्दल संबंधित महिलेने औरंगाबाद पोलिसांचे आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2016 रोजी प्रकाशित
व्हॉट्स अॅपद्वारे पोलिसांची सिमल्यातील महिलेस मदत
सिमला येथे फिरावयास गेलेल्या पश्चिम बंगालमधील महिलेशी गाडीचालकाने गैरवर्तन केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-05-2016 at 05:25 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police help shimla women from whatsapp