छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील इतर मागास कल्याण संचालनालयांतर्गत घेण्यात आलेल्या सहायक संचालक, संशोधन अधिकारी व प्रकल्प अधिकारी गट-अ या संवर्गातील परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीची प्रतीक्षा आहे. डिसेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या या परीक्षेचा निकाल ३ जुलै रोजी जाहीर झालेला आहे.
लोकसेवा आयोगाकडून वरील तीन पदांच्या एकूण २६ जागांसाठीची जाहिरात डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर परीक्षा व सात महिन्यानंतर निकाल जाहीर झाला आहे. निकालामध्ये एकूण १४३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात १३, आैरंगाबादमधून १६, मुंबईतून ३७, नागपूरमधून २१ तर पुणे विभागातून ५६, असे मिळून एकूण १४३ उमेदवार पात्र ठरले आहेत.
मात्र, अद्याप मुलाखतीची निश्चित तारीख कळवण्यात आली नसून, अन्य विभागाच्या मुलाखती पार पडल्याचे उमेदवार सांगत आहेत. सहायक संचालक, संशोधन अधिकारी व प्रकल्प अधिकारी गट-अ संवर्गातील पात्र उमेदवारांना मुलाखतीची प्रतीक्षा आहे. यासंदर्भाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डाॅ. सुवर्णा खरात यांच्याशी संपर्क साधला, मात्र, संवाद होऊ शकला नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या संदर्भाने काही प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, मुलाखतीबाबतची माहिती घेऊनच त्यावर अधिक बोलता येईल. अतुल सावे, बहुजन कल्याणमंत्री.
परीक्षेत पात्र ठरलेल्या काही उमेदवारांनी एमपीएससीच्या सचिवांकडे ११ सप्टेंबर रोजीच एक निवेदन पाठवून परीक्षेला आठ महिने उलटून गेले असून, त्वरीत मुलाखती घ्याव्यात, अशी विनंती केली आहे.