मत्स्यशेती, शिंपले-मोती निर्मितीसाठी शेततळे भाड्याने

मागील तीन वर्षांत झालेला पाऊस सोडला तर मराठवाड्याला कायम दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे.

|| बिपिन देशपांडे

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून योजनेचा अधिक लाभ

औरंगाबाद : मुबलक पावसामुळे शेतीला पुढील सहा ते आठ महिने पाण्याची चणचण भासणार नाही. तोपर्यंत ‘पडून’ राहणारे शेततळे मत्स्यशेती, शिंपल्यातून मोती तयार करण्याच्या व्यवसायासाठी भाड्याने देणे-घेण्याचा नवा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे मांडला जात असून त्यातून २५ ते ५० हजार रुपये मिळण्यासह भागीदार होण्याचाही एकमार्ग पर्याय ठेवला जात आहे. मराठवाड्यासह पश्चिाम महाराष्ट्रातही शेततळी १२ महिन्यांसाठीच्या करार पद्धतीने भाड्याने देणाऱ्यांची संख्या आणि घेणाऱ्यांची साखळी वाढत आहे.

मागील तीन वर्षांत झालेला पाऊस सोडला तर मराठवाड्याला कायम दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे. दुष्काळाच्या खाईत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना मागील काही वर्षांपासून राबवण्यात येऊ लागली. औरंगाबाद या एका जिल्ह्यातच ५ ते ७ हजारांवर शेततळी असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरासरीपेक्षाही कमी प्रमाणातील पर्जन्यमानामुळे शेततळे हे दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर पडण्याचा एक मार्ग असल्याचे मानले जाते. बऱ्याच वेळा शेततळ्यातील पाणीही अपुरे पडू लागल्याची वेळ शेतकऱ्यांवर यायची. डिसेंबरपासूनच शेततळ्यातील पाण्याचा वापर करावा लागायचा. मात्र, यंदा अतिवृष्टीने ५० टक्क्यांपेक्षाही अतिरिक्त पाऊस झाला. मराठवाड्यात आजपर्यंत ११०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी शेततळ्यातही मुबलक पाणी असून इतर जलसाठेही तुडुंब आहेत. पुढील सहा ते आठ महिने शेततळ्यातील पाण्याची पिकांसाठी शेतकऱ्यांना गरज भासणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांकडील ‘पडून राहणाऱ्या’ शेततळ्यांचा भाड्याने घेऊन मत्स्यशेती, शिंपले टाकून मोती तयार करण्यासाठी वापर करण्याच्या व्यवसायात काही जण उतरले आहेत.

विशेषतङ्म उच्चशिक्षित तरुण असून त्यांच्याकडून औरंगाबादजवळील काही गावांमधील शेततळ्यांना अधिक पसंती मिळत आहे. यासाठी मत्स्य व्यवसायासाठीचे वाहन शेततळ्यापर्यंत नेऊन त्याचा उपसा करण्यात रस्ते मार्गाची अडचण येणार नाही किंवा वितरण व्यवस्थेलाही सुलभ असल्याचे कारण सांगितले जाते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शेततळ्यामध्ये मिश्र पद्धतीने मत्स्यशेती केली जात आहे. त्यामध्ये पंगाईत किंवा पंकज, कटला, रोहा, रूपचंद अशी चार ते पाच प्रकारची मत्स्यबीजं सोडली जातात. सुरुवातीला आम्हालाही या व्यवसायात तोटा सहन करावा लागला. मात्र, विजयवाडा येथील अजित चौधरी, उदगीरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठासह कोकण विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली मत्स्यशेती आता फायद्याची ठरू लागली आहे. रविवारीच औरंगाबादजवळील माळीवाडा, आसेगावमधील शेततळ्यातून तब्बल साडेआठ किलोचा मासा काढण्यात आला आहे. सात-सात किलोपर्यंत मासे निघत असून व्यापाऱ्यांकडून मागणी वाढू लागली आहे, असे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्टातील अनेक भागांत शेततळी कमी-अधिक प्रमाणात १२ महिन्यांच्या करार पद्धतीने भाड्याने घेतली जात आहेत. शेततळ्याचा आकार पाहून २० ते ५० हजार रुपयांपर्यंती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. काही ठिकाणी शेततळी मालक शेतकऱ्यांना व्यवसायात भागीदार करून घेतले जाते. मत्स्यशेतीत काही उच्चशिक्षित तरुण उतरले आहेत.– राजेंद्र काळे,  संचालक कृषी फिशरी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rental farms for fish farming mussel pearl production akp

Next Story
केंद्राच्या रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्गदर्शनाचा निर्णय
ताज्या बातम्या