भविष्य अनिश्चित वाटू लागल्याने मराठवाडय़ात गावी परतलेली मंडळी आता पुन्हा पुणे येथे परतू लागली आहेत. बऱ्याच कंपन्यांमध्ये कामगारांची आवश्यकता असल्याने अनेकांना दूरध्वनी करून पुन्हा बोलावले जात आहे. मात्र, मुंबईऐवजी पुणे बरे अशी भावना तयार होत आहे. गेल्या आठ दिवसांत पुण्याकडे जाण्यासाठी पासची संख्या वाढत आहे. मुंबईहून आलेली मंडळी मात्र शेतीच्या कामात स्वत:ला गुंतवून घेताना दिसत आहेत. उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यंमध्ये प्रत्येक गावात किमान २५० हून अधिक जण आले होते.

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील म्हणाले की, ‘प्रत्येक गावातून आता पुणे येथे जाण्याचा परवाना काढून द्या, अशी विनंती करणारे दूरध्वनी वाढू लागले आहेत. पुणे येथे काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. त्यातील काही जणांना आता कामावर बोलावण्यात येत आहे. ज्या अर्थी टाळेबंदीमध्ये शिथिलता आणून काम सुरू झाले आहे, त्या अर्थी कामावर हजर होता येईल, अशी धारणा तयार होत आहे.’ अनेक  गावात ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांच्या घरातील मुंबई-पुण्यात कमाविण्यासाठी गेलेली मंडळी येथे आल्यावर पेरणीच्या कामात लक्ष घालत आहेत. पेरणीनंतर बाहेरून आलेली मंडळी काय करतील, असे प्रश्न असतील. मात्र, रोजगार हमीच्या कामावर तशी गर्दी होण्याची शक्यता कमीच असल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात. लातूरचे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे म्हणाले, ‘पुणे येथे जाण्यासाठी परवाने मागणाऱ्याची संख्या वाढली आहे. तसेच उत्तर प्रदेशात परतलेले काही मजूरही पुन्हा परत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.’ महापालिका क्षेत्रात वाहन परवाने देण्याचे काम पोलीस विभागाकडून होते. ऑनलाइन कार्यपद्धती असल्याने एका खास शहराच्या बाबतीत असा कल असल्याचे दिसून नाही. औरंगाबाद जिल्ह्यातून असे सांगता येणार नाही, असे उपायुक्त मीना मकवाना म्हणाल्या. पुणे शहरातून औरंगाबाद येथे येणाऱ्यांची संख्या मात्र जास्त आहे. तुलनेने ग्रामीण भागात राहणारे कंत्राटी कर्मचारी परत पुण्याच्या दिशेने जाऊ लागले आहेत.

पुण्याची ओढ

बीड जिल्ह्यात सध्या चार हजारांहून अधिक वाहन परवाने काढण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधिक परवाने पुण्याकडे जाण्यासाठी आहेत. त्यातही नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्याची परवानगी मागणारे आहेत. वाहनचालकांनाही प्रवासी सोडल्यानंतर येणारे प्रवासी कोणते याचे गणित माहीत झाले असल्याने प्रवासी परवाने किती दिवस द्यायचे, असा प्रश्न विचारला जात आहे.