छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विकास विभागातील गट-ब अराजपत्रित व गट-क संवर्गातील सुमारे ६११ विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील काही निकाल लागून त्यांची कागद पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. मात्र, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासह लघुटंकलेखक पदांचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नसून, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

१६ जानेवारी २०२५ रोजी लघुटंकलेखकपदासाठी परीक्षा घेण्यात आली. तर ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल पदासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. परीक्षा या तीन सत्रात घेण्यात आल्या. २४ फेब्रुवारी रोजीच सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा सहायक व छायाचित्रकार (कॅमेरामन) व प्रोजेक्टर ऑपरेटर पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यांचे निकाल लागले. कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रियाही पार पडली. मात्र, २४ फेब्रुवारी रोजीच दुपारच्या सत्रात पार पडलेल्या ग्रंथपाल व सहायक ग्रंथपाल पदांच्या परीक्षेचा निकाल ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लागलेला नाही. तर अधीक्षक, प्रयोगशाळा सहायक, मुख्य लिपिक, स्त्री व पुरुष वाॅर्डन आदींचे निकाल लागलेले आहेत. ६११ पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया आयबीपीएस संस्थेकडून राबवण्यात आली. या संस्थेशीही संपर्क केला असता निकालाशी संबंधित माहिती नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भाने आदिवासी विकास मंत्री डाॅ. अशोक ऊईके, त्यांचे स्वीय सहायक संतोष भोईर, विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी दोन दिवस संपर्क करून, संदेश पाठवूनही त्यांच्याकडून निकालाची माहिती मिळू शकली नाही. तर ठाणे, अमरावती, नागपूर आदी विभागांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळ पाहात राहा, असे उत्तर दिले जात आहे.