छत्रपती संभाजीनगर – बीडमध्ये अमानूष आणि अमानवीय दुष्कृत्याच्या घटना पुन्हा घडत असून, अशाच पद्धतीने पोलीस दलातील एका निवृत्त सहाय्यक फौजदाराला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मिळून मारहाण केली व तोंडावर लघुशंका करण्यासारखे माणुसकीला न शोभणारे दुष्कृत्यही केले. ही घटना शुक्रवारी दुपारी माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम दाजीबा सिरसाट, असे मारहाण झालेल्या निवृत्त फौजदाराचे नाव आहे. त्यांनी या घटनेची माहिती सांगितली की, आपल्याला आता वयानुसार शेतीतले कामकाज होत नाही. त्यामुळे सालगडी म्हणून नातजावई विश्वनाथ पंडित यांना नेमले आहे. विश्वनाथ पंडित हे ऊसतोड मजूरही आहेत. त्यांनी मंजरथ (ता. पाथरी) येथील एका मुकादमाकडून काही रक्कम उचल घेतली होती. पंडित यांच्या मते त्यांनी बाराशे रुपये घेतले. मात्र मुकादमाच्या माणसांनी दीड लाख रुपये रक्कम असल्याचे सांगितले.
संबंधित रक्कम न दिल्याने सालगड्याचे अपहरण करून त्याला नजीकच्या एका स्मशानभूमीत नेले. तेथे आपल्याला विश्वनाथने फोन करून बोलावून घेतले व दीड लाखांची मागणी केली. तेवढी रक्कम घेऊन गेल्यानंतर सालगड्याला सोडून टोळक्याने आपल्यालावरच पिस्तुल रोखून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. अनैसर्गिक हावभाव करून तोंडावर लघुशंका केली. तसे तक्ररीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, सर्व आरोपींचा शोध आहे, मारहाणीसोबतच तोंडावर लघुशंका केल्याचे राजाराम सिरसाट यांनी तक्रारीत नमूद केले. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. – बी. पी. कोळी, पोलीस निरीक्षक, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे.