छत्रपती संभाजीनगर – मुलबाळ होत नसल्याने पत्नीनेच सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात बुधवारी समोर आले. यासंदर्भातील माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी असलेली पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय ५१) हिला अटक केली आहे.

लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरातील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (वय ६४) हे १३ मार्चला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करुण अंत झाला होता. दरम्यान, त्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावाकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

मात्र शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, हवालदार हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे यांनी पमुसिंग यांच्या मृत्यूचा तपास करून तो खून असल्याचे समोर आणले. भौतिक पुराव्यावरून तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. निवृत्त शिक्षकाच्या खुनाच्या संशयाची सुई मनोरुग्ण असलेल्या त्याच्या पत्नीभोवती फिरत होती. अखेर मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारती पमुसिंग पपैया हिने नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृताचा पुतण्या नीलेश गोपालसिंग पपैया (वय ४०, आसेगाव ता. गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून भारती पपैया हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारती पपैया हिला अटक केली असून, न्यायालयाने तिची रवानगी हर्सूल कारागृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.