छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी तथा खुल्या मैदानांवर अंधार पडल्यानंतर मद्यार्क सेवन करून असभ्य वर्तन करणाऱ्या ९४ जणांवर शुक्रवारी सायंकाळी कारवाई करत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ‘लोकसत्ता’मध्ये विविध शहरांमधील खुले भूखंड मद्यसेवनासाठी वापरले जात असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आले होते.

पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ८ ऑगस्टला सायंकाळी ७ ते रात्री १० च्या दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ विभागांतर्गत सिडको, एम. सिडको, जिन्सी, हर्सूल, जवाहरनगर, उस्मानपुरा, सातारा, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील खुल्या भूखंडांवर मद्यपान करणारांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

राज्य शासनाकडून उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘बसण्या’साठी परमिट रूमचे दर परवडत नसलेल्या मद्यपींची पावले खुले भूखंड, खेळाच्या मैदानांकडे अंधार पडू लागल्यानंतर वळू लागली आहेत. रात्री अंधार पडताच या मैदानांमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याच्या पार्ट्या रंगत असून पोलीस, प्रशासन याप्रकरणात कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र शहराशहरांमधून दिसून येत आहे. या संदर्भाने ‘लोकसत्ता’च्या ३ ऑगस्टच्या अंकामध्ये ‘खुल्या भूखंडांवर झिंगती पावले’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

राज्य शासनाने मद्य विक्रीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट), परवाना शुल्क आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्क वाढवले आहे. मूल्यवर्धित कर ५ वरून १० टक्के, परवाना शुल्क १५ टक्के, तर भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावरील (आयएमएफएल) उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. या नव्या दरामुळे बाजारपेठेत येणारे मद्य आता महागले असून परमिट रूममध्ये जाऊन ‘बसणे’ हे खिशावर भार ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच मद्यपी खुल्या भूखंडांचा आधार घेत असल्याचे शुक्रवारच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.