छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या वाहनचालकाने हिबानामा अर्थात बक्षीसपत्राच्या आधारे एक नव्हे, दोन जमिनी कमी किमतीमध्ये घेतल्या. शिग्रगणक दरानुसार १२३ कोटी रुपयांचा हा व्यवहार करताना बजावण्यात आलेली मालमत्ता मालकी नोंदीपूर्वी दिली जाणारी नगर भूमापन विभागाकडून आक्षेपाबाबतची क्र. ९ ची नोटीस संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यानंतर केवळ चार सेकंदांत वाहनचालक जावेद रसुल शेख याने ‘डाउनलोड’ केली.

केवळ एवढेच नाही, फेरफार नोंदवताना केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे झालेला हा व्यवहार तातडीने व्हावा म्हणून दबावासाठी एका मंत्र्याचा दूरध्वनी आला असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीमध्ये केला.

जावेद रसूल शेख या वाहनचालकाने मीर मेहमूद अली खान यांच्याकडून एक नव्हे, तर दोन जमिनी घेतल्या. सालारजंग मूळ मालक असलेल्या या जमिनीचे बक्षीसपत्र रक्ताच्या नात्यातील व्यक्तींबरोबरच होऊ शकते. मात्र, असे न करता वाहनचालकाच्या नावे करण्यात आले, तेही केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकावर. पूर्वी केवळ अडीच एकर जमिनीचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. त्या जमिनीचे बाजारमूल्य १५० कोटी रुपये होते. शिग्रगणक दरानुसार या दोन्ही जमिनींचा दर ३६ हजार १९० रुपये एवढा आहे.

या दरानुसार भुमरे यांच्या वाहनचालकास बक्षीसपत्राच्या आधारे ५०० कोटी रुपयांची घेता आली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या दोन्ही जमिनींचे क्षेत्रफळ साडेआठ एकर असून, मालमत्ता नोंदवहीत मालकीचे नोंद घेऊन देण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्या मंत्र्यास यात वाटा देण्याचे निश्चित करण्यात आले होते, असा दावा माजी खासदार जलील यांनी केला.

दोन्ही प्रकरणांत साक्षीदार म्हणून रवींद्र बाळासाहेब तोगे व नितीन शेषराव एरंडे यांची नावे आहेत. दोन्ही हिबानामा म्हणजे बक्षीसपत्रासाठी लागणारे मुद्रांकही एकाच विक्रेत्याकडून खरेदी करण्यात आले होते. केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकावरील मजकुराच्या आधारे नोंदी घेण्यापूर्वी नगर भूमापन कार्यालयात एका जमीन व्यवहारात रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी नोटीस बजावली, तर दुसरी नोटीस कार्यालयाची वेळ संपल्यानंतर ६ वाजून ४२ मिनिटांनी काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही नोटीस वाहनचालक जावेद रसूल याने अनुक्रमे चार आणि ३२ सेकंदांमध्ये ‘डाउनलोड’ करून घेतल्या. असे काम करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याच्या दूरध्वनीवर एका मंत्र्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे हे कामही वेगवानपणे करण्यात आले. वाहनचालकाच्या बक्षीसपत्रातील हा वेग अनाकलनीय असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी खासदार जलील यांनी केली. या प्रकरणात, ‘आपला काही संबंध नाही. एकदा गाडीतून वाहनचालकाने आम्हास सोडले, की त्याने इतर वेळी काय करावे हे आम्ही ठरवू शकत नाही,’ असे स्पष्टीकरण आमदार विलास भुमरे यांनी पूर्वी दिले होते.