बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : गुणवत्ता, संशोधनावर भर देण्याऐवजी वादविवादाच्या भानगडीत अडकून पडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी सोमवारी प्रशासनाची ‘समीक्षा’ केली. पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांनी गावोगाव पायपीट करत परिश्रमपूर्वक मिळवलेल्या चार हजारांवर दुर्मीळ पोथ्या विद्यापीठाच्या मराठी विभागातून ग्रंथालयात हलवून तेथे अडगळीत ठेवल्यावरून डॉ. रसाळ यांनी खंत व्यक्त केली. संशोधनाच्या ज्या उद्देशाने विद्यापीठ स्थापन झाले तोच आपण विसरून गेलो असून त्याचे दु:ख कोणालाच वाटत नाही हे अत्यंत खेदजनक असल्याचे सांगत सध्या सुरू असलेल्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी न्या. पळणीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या समितीने मराठवाडा ही संतांची भूमी ओळखून विद्यापीठात संत वाङ्मयाचे स्वतंत्र संशोधन व्हायला हवे, असा एक अहवाल दिला होता. त्यानंतर विद्यापीठ स्थापन झाले. त्यातही प्रथम मराठी आणि अर्थशास्त्र विभाग स्थापन झाले. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात संत वाङ्मयाच्या पोथ्या संकलित करण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला. वा. ल. कुलकर्णी, आपण स्वत: व डॉ. यू. म. पठाण असे आम्ही तिघे मराठी विभागात कार्यरत होतो. डॉ. यू. म. पठाण यांच्यासोबत १९६० ते १९९०, अशी तीन दशके काम केले. अत्यंत सौहार्दतेने आम्ही तिघे मराठी विभागात कार्यरत होतो. राजकारणविरहित तेव्हा मराठी विभागात कामकाज चालायचे. डॉ. पठाण मध्ययुगीन वाङ्मयाचे अभ्यासक. त्यांच्याबाबत अशी चिंता वाटत असे की, खेडय़ा-पाडय़ात जर डॉ. पठाण गेले आणि पोथ्या गोळा करू लागले तर त्यांना सहकार्य किती मिळेल? त्यांचा धर्म तर आड येणार नाही, असा प्रश्न, भीती आमच्या मनात उपस्थित व्हायची. परंतु डॉ. पठाण यांनी ही भीती खोटी ठरवली. त्यांच्या बोलण्यातील ऋजुता, त्यांचा संत वाङ्मयाचा व्यासंग याचा प्रभाव खेडय़ातल्या लोकांवर पडत असत आणि ते मोठय़ा आनंदाने डॉ. पठाण यांच्या हवाली पोथ्या देत.

अतिशय मौलिक चार हजारांवर पोथ्या डॉ. पठाण यांनी मराठी विभागात गोळा केल्या. हे अतुलनीय काम आहे. आज मात्र डॉ. पठाण यांनी गोळा केलेल्या चार हजारांवर पोथ्या मराठी विभागातून ग्रंथालयात हलवण्यात आल्या आहेत. त्याचे पुनर्लेखन, प्रकाशन, संशोधन तर सोडाच पण तेथे त्या अडगळीत पडल्या असून त्याची कोणाला ना खंत ना खेद वाटतो, अशी समीक्षाच डॉ. रसाळ यांनी विद्यापीठाच्या एकंदर कारभाराकडे लक्ष वेधत केली. पोथ्या परिश्रमपूर्वक संकलित करण्यासह त्याची वाङ्मयीन गुणवत्ताही जोपासणाऱ्या डॉ. पठाण यांचे महत्त्वच विद्यापीठाला लक्षात आले नाही, असेही डॉ. रसाळ यांनी सांगितले. डॉ. पठाण यांना सोमवारी येथे अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दहावा भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार डॉ. रसाळ हस्ते आणि मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. रसाळ यांनी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या कारभारावर खंत व्यक्त करत एकूणच समीक्षा केली. प्राचार्य ठाले पाटील यांनीही डॉ. रसाळ, वा. ल. कुलकर्णी व डॉ. पठाण यांच्या काळातील मराठी विभागाचे महत्त्व सांगितले.

वादामुळे चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ अनेक वादांमुळे चर्चेत आले आहे. मध्यंतरी व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य आणि कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यात वाद पेटला होता. पत्रकार बैठक घेऊन व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंवर जाहीरपणे आरोप केले होते. कुलगुरूंनी अलीकडेच विद्यापीठांतर्गत येत असलेल्या चार जिल्ह्यांतील मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याकडे हयगय करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. विद्यापीठात राजकारणाला खतपाणी घालते जात असल्याचा आरोप करत विशिष्ट पक्षांच्या नेत्यांचे विद्यापीठात मोठी फलके लावली जात असल्यावरून विद्यार्थी संघटनाही मागील आठवडय़ात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. विद्यापीठात मागील आठवडय़ात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही वाद निर्माण झाला होता. पत्रिकेवर स्थानिक लोकप्रतिनिधींची नावेच वगळून संबंध नसणाऱ्या मंत्र्यांची नावे प्रकाशित केली होती. त्यावरून वाद पेटल्यानंतर ऐन कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी नव्याने पत्रिका छापून वगळण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींची नावे पुन्हा पत्रिकेवर घेतली होती.