शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. “संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि ते शिवसेना पक्ष कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी करत आहेत,” असा आरोप संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर केला. ते रविवारी (२५ डिसेंबर) औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

संजय शिरसाट म्हणाले, “शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे चालवतच नाहीत. ते राष्ट्रवादी चालवत आहे आणि संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माध्यमांनी ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत हा गैरसमज डोक्यातून काढावा. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना पक्ष कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी ते करत आहेत.”

“…तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील”

“जेव्हा शिवसेना संपेल, तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील,” असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर टीका केली.

व्हिडीओ पाहा :

भाजपा आणि शिंदे गटाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एयू (AU) या कोडचा उल्लेख करत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेल्या ईएस (EU) कोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. आता या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं.

“अडीच वर्षात ईएस कोण याची चौकशी करायला पाहिजे होती”

ते म्हणाले, “खासदार विनायक राऊत किंवा खासदार संजय राऊत यांना रोज एक विषय पाहिजे असतो. यांना पक्षाचं काहीच देणंघेणं नाही. त्यांचा पक्ष संपत चालला आहे याची त्यांना चिंता नाही. त्यांना आरोप करण्यात रस आहे. ते अडीच वर्षे सत्तेत होते. या अडीच वर्षाच्या काळात ईएस कोण, डीएस कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता. “

हेही वाचा : “खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

“AU कोडवरून टीका झाली, म्हणून ES कोड पुढे करत प्रत्युत्तर”

“दिशा सालियनप्रकरणी AU कोडवरून टीका झाली. त्याला ES कोड पुढे करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी सांगितलं होतं की, सीबीआयने चौकशी केली आहे. आता सीबीआयने उघड केलं की, सीबीआयने अशी कोणतीही चौकशी केलेली नाही. म्हणजे यांनाच पूर्ण माहिती नाही. यांची माहितीच अपुरी असल्यामुळे अशी वक्तव्ये करावी लागत आहेत. प्रत्युत्तर द्यायचं म्हणून ते ईएस कोडचा आरोप करत आहेत,” असं मत संजय शिरसाटांनी व्यक्त केला.