शिवसेनेने दुपारी धर्मनिरपेक्षतेची आणि सायंकाळी हिंदुत्वाची भूमिका मांडू नये. शिवसेना आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राज्याच्या सत्तेत आली आहे. तेव्हा शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याच्या मुद्यावर एमआयएमसोबत येण्यास काही हरकत नाही, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्याच मुद्यावर ‘‘तुम्ही काँग्रेसला साथ देणार का,’’ या प्रश्नावर थेट उत्तर न देता,आम्ही पक्षीय भेद विसरून सरकारविरोधात कोणासोबतही रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले. एमआयएमकडून येत्या २० डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात एमआयएमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी औरंगाबाद येथे रविवारी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. खासदार जलील यांनी विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘‘मोदी आणि शहा यांनी बहुमताच्या जोरावर देशात आपण करू तोच कायदा, या पद्धतीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला तीन तलाक, त्यानंतर ३७० कलम आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले आहे. त्याचेही पडसाद संपूर्ण देशात आता उमटत आहेत. आसामनंतर केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. या कायद्याद्वारे विशिष्ट घटकाला त्रास देण्याचा स्पष्ट उद्देश केंद्राचा दिसतो आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणे योग्यच आहे, असे मतही त्यांनी मांडले. या विधेयकामुळे आता विनोदातही आम्हाला पाकिस्तानात जावे लागेल, असे बोलले जात आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी त्याआडून मोदी आणि शहा हे भय पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
माजी खासदार खैरे यांना चिमटा
खासदार जलील यांनी सुरुवातच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांना चिमटा काढला. औरंगाबादेत अलीकडे चिकलठाणा विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्याचा संदर्भ देत खासदार म्हणून औरंगाबादचे प्रश्न मांडताना काही चांगले अनुभव आल्याचे नमूद करत खासदार जलील यांनी, ‘‘बोलणारा खासदार संसदेत पोहोचला तर त्याची दखल घेतली जाते’’, अशा शब्दांत खैरे यांना चिमटा काढला. येथील विमानतळावरून आठवडय़ातून किमान एकतरी उड्डाण दुबई, सिंगापूर, थायलंड आदी देशांसाठी सुरू करावे, अशी मागणी आपण विमान प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंदसिंह यांच्याकडे केली आहे. अरविंदसिंह हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.
महिलांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
नागरिकत्व विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी २० डिसेंबर रोजी दुपारची नमाज अदा केल्यानंतर आझाद चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. चंपाचौकापासून मोर्चाचे नेतृत्व हे महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयावर हा जिल्हास्तरीय मोर्चा निघणार आहे, अशी माहितीही खासदार जलील यांनी दिली.