शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. यावर आता आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. स्वतः शिरसाठ आठवड्यातून केवळ दोन दिवस मतदारसंघात असतात आणि जनतेला भेटत नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांना विचारायचा अधिकार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच उपस्थित सैनिकांना संजय शिरसाठ यांना कुणी घेरलं आहे? असा सवाल केला. यावर शिवसैनिकांनी शिरसाठ यांना डान्सबारने घेरल्याचा आरोप केला. औरंगाबादमध्ये शिवसेनेचा शिवसैनिक मेळावा सुरू आहे. याठिकाणी दानवे बोलत होते.

अंबादास दानवे म्हणाले, “आमदार संजय शिरसाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाहीत. मात्र, हे स्वतः आपल्या मतदारसंघात किती दिवस असतात? ते आठवड्यातून दोन दिवस असतात. हे स्वतः मतदारसंघात दोन दिवस असतील आपल्या मतदारांना भेटत नसतील तर यांना उद्धव ठाकरे यांना विचारायचा अधिकार आहे का? हे दोन दिवसच मतदारसंघात असतात हे सत्य आहे, पण उद्धव ठाकरे भेटत नाही हे असत्य आहे.”

“मागील २-३ महिन्यात चारवेळा संजय शिरसाठ वर्षावर”

“मागील २-३ महिन्यात चारवेळा संजय शिरसाठ वर्षावर गेले. पाणी पुरवठा बैठक, अधिवेशनाच्या आधी गेले, महिनाभरापूर्वी स्नेहभोजन ठेवलं त्याला गेले. तुम्ही स्वतः जनतेला भेटत नाही, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ महिन्यात चारवेळा भेटतात. तरी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे भेटत नाहीत असा आरोप करतात,” असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

“हे बडवे तुम्हाला गोड कसे लागतात?”

दानवे पुढे म्हणाले, “संजय शिरसाठ पत्रात म्हणतात उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरलं, मग संजय शिरसाठांना कोणी घेरलं? उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरलं आहे, तर हे बडवे तुम्हाला गोड कसे लागतात? तुम्ही त्यांना घरी जेवायला का बोलावतात, यांच्या घरी चार चार वेळा भेटायला का जाता. याचा अर्थ तुम्हाला बडवेच आवडतात. याचा अर्थ एका चांगल्या मुख्यमंत्र्याला औरंगाबाद पश्चिमच्या आमदाराने बदनाम केलं. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.”

हेही वाचा : Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इतर कुणी बोट दाखवलं असतं तर ते तोडलं असतं”

“आपल्या पक्षप्रमुखाकडे कुणाचं बोट दाखवण्याची हिंमत नाही. इतर कुणी बोट दाखवलं असतं तर ते तोडलं असतं, मात्र आपल्यातीलच एकाने बोट दाखवल्याने ते बोट तोडता आलं नाही,” असंही दानवेंनी नमूद केलं.