छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम पक्षिजीवनावरही झाले असून, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये पितृपंधरवड्यात येणाऱ्यांची ‘काक’स्पर्शासाठी पंचाईत झाली आहे. पिंडाला कावळा शिवण्यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. हीच स्थिती राज्यात अनेक ठिकाणी आहे. रविवारी सर्वपित्री अमावस्या असून, पावसाच्या इशाऱ्याने श्राद्धावर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर येण्याची चिन्हे आहेत.
मराठवाड्यातील ६४० गावांमध्ये १४ व १५ सप्टेंबरला अतिवृष्टीची नोंद असून, ३२ मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाच्या माऱ्याने पक्ष्यांची घरटी मोडून पडली आहेत. परिणामी अनेक घरट्यांमधील अंडीही फुटली आहेत. कावळे साधारणपणे पावसामुळे नजीकच; पण जिथे काळे ढग, पाऊस नाही तिथे तात्पुरते स्थलांतर करतात. पैठणमध्ये जांभूळबन आदी भागांत पावसाने मोठे नुकसान झाले असून, या भागात कावळ्यांची संख्या चांगलीअसते. आता ते इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. शिवाय जायकवाडी प्रकल्पातून विसर्गही सुरू आहे. हे सर्व थांबेल तेव्हाच कावळे परततील, असे पक्षी अभ्यासक सांगतात.
कचराकुंड्यांमधील शिळे अन्न, मृत प्राणी यांचे भक्षण करून कावळे वास्तव्य करत असत, मात्र नागरीकरणामुळे कचराकुंड्या बंदिस्त झाल्या, उकिरडे नामशेष झाले. त्यामुळे कावळ्यांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे, असे मत अलिबाग येथील पक्षिनिरीक्षक प्रवीण कवळे यांनी नोंदवले आहे. उंदीर मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जातो, नंतर मेलेले उंदीर उघड्यावर टाकले जातात. या मेलेल्या उंदरांच्या शरीरात विषारी द्रव्ये तशीच राहतात, अशा उंदरांचे मांस खाल्ल्याने कावळ्यांचा मृत्यू होतो, असे पक्षिमित्र राजू मुंबईकर यांनी सांगितले.
यजमानांची संख्या रोडावली
पैठणमध्ये पितृपंधरवड्यात पिंडदानासाठी येणाऱ्या यजमानांची संख्या रोडावली आहे. काही किरवंतांकडे मागील बारा दिवसांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच यजमान आले आहेत. गतवर्षी याउलट परिस्थिती होती. या चित्राचा परिणाम पितृपंधरवड्यातील अर्थकारणावर झाला आहे. ‘‘पिंडस्पर्शासाठी कावळ्यांची दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. कावळ्यांची संख्या कमी दिसत असून, यंदा पिंडदानासाठी येणाऱ्या यजमानांची संख्याही रोडावली आहे,’’ असे प्रदीप महेश पाठक या किरवंताने सांगितले.