छत्रपती संभाजीनगर : येथील ‘संडे क्लब’ आणि देशपांडे परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी’ अभिजित जोंधळे यांची निवड करण्यात आली आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर निरपेक्षपणे कार्यरत राहिलेल्या श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्याचे वितरण ३ ऑगस्टला केले जाईल.
अभिजित जोंधळे हे अंबाजोगाईत ‘अनुराग पुस्तकालय’ चालवतात. त्यांनी गेली दहा वर्षे ‘ पुस्तकपेटी ‘ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके उपलब्ध होत आहेत. गेल्या दहा वर्षांत किमान १५ हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्काराचे यंदा चवथे वर्ष आहे. यापूर्वी मिर्झा अब्दुल कय्युम नदवी ( छत्रपती संभाजीनगर ) जीवन इंगळे (खटाव, जि. सातारा) आणि मोहिनी कारंडे (पुणे) यांना हा पुरस्कार दिला गेला.