औरंगाबाद: महोत्सवापूर्वीच वादात अडकलेल्या सिल्लोड येथील कृषी, कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. या वादामागे आपल्याच पक्षातील एक नेता असून त्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. वादामुळे निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वरिष्ठांना दिली आहेत. त्यांचे समाधान झाल्यामुळेच ते पाठिशी असल्याचा दावाही सत्तार यांनी  केला. विधिमंडळ अधिवेशनात सत्तार यांच्याभोवती जमीन आणि महोत्सवाच्या आयोजनातील गैरप्रकारामुळे  टीका झाली होती.