छत्रपती संभाजीनगर -हैदराबाद (मराठवाडा) मुक्तिसंग्रामाचे अग्रणी नेते आणि शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. काँग्रेसचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण निमित्ताने रविवारी येथे येत असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच क्रांती चौकात अनेक महिन्यांपासून तयार असताना आणि अनावरणाला मुहूर्त न मिळू शकलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्याही पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
स्वामीजींच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम रविवारी क्रांतिचौक येथील काला चबुतरा परिसरात होईल. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या या स्थळावर मराठवाड्याला निझामी जोखडापासून मुक्ती देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. ती पूर्ण झाली असून यानिमित्ताने मुक्तिसंग्रामाचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीसमोर राहील.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या पाठपुराव्यामुळे क्रांतिचौकात स्वामीजींचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल. गुरुवारी रात्री क्रांतिचौक येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, यांच्यासह एस आर टी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. मनोरमा शर्मा, सचिव सारंग टाकळकर, सुरेश देशपांडे, डॉ. शिरीष खेडगीकर, डॉ. जगदीश खैरनार मोहन फुले, शिरीष बोराळकर, प्रमोद देव, हेमंत देशमुख, सदाशिव पोहंडूळकर, किशोर शितोळे, भरत राठोड आदींची उपस्थिती असेल.
स्वातंत्र्य प्रेमी नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन एस आर टी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ
जन्म : ३ ऑक्टोबर १९०३- मृत्यू : २२ जानेवारी १९७२
स्वामी रामानंदतीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर, हैदराबाद संस्थानातील नसले तरी हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीला दिशा देत या भू प्रदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. शिक्षक असलेले स्वामीजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या गावचे. प्राथमिक शिक्षण गाणगापूर, सोलापूरच्या सरकारी शाळेत. राष्ट्रीय चळवळीविषयी बालपणापासूनच प्रेम, मॅट्रीकला शिक्षण असहकार आंदोलनात शाळा सोडली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परिक्षा देत अमळनेर व पुणे येथे पुढील शिक्षण घेतले.
जून १९२९ मध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू. पुढे स्वामीजींची वाटचाल संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीत झाली. हैदराबाद ( मराठवाडा) मुक्तिसंग्रामाला नियोजनपूर्वक दिशा देण्याचे कार्य केले. पंजाबचे कवी संत स्वामी रामतीर्थ यांचे शिष्य नारायण स्वामी यांचे हातून हिप्परगा येथे खेडगीकर यांनी ‘विद्वत संन्यास’ घेतला, तेव्हापासून स्वामी रामानंदतीर्थ हे नाव मिळाले.
आंदोलन काळात त्यांनी नेतृत्व स्वीकारले, शिक्षण क्षेत्र सोडून राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घेतले. सत्याग्रहाच्या दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व केले, दीड वर्ष सक्त मजूरीची शिक्षा झाली. स्टेट काँग्रेसचे अध्यक्षपद. विविध परिषदा, तात्कालिक आदोलने यामधून आघाडीवर राहून स्वामीजींनी संपूर्ण संस्थानात मार्गदर्शन केले.
विनोबाजींच्या भूदान पदयात्रेपूर्वीच स्वामीजींना तेलंगणात १९५० साली शेतकऱ्यांना दिलासा देणारी पदयात्रा केली. १९५२ मध्ये गुलबर्गा मतदारसंघातून आणि १९५७ मध्ये तत्कालीन औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) मतदारसंघातून स्वामीजी लोकसभेवर निवडून गेले. संयुक्त महाराष्ट्रात सर्व मागास भागांचा समतोल विकास व्हावा यासाठी स्वामीजींनी मोलाचे कार्य केले.
