छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा १२ ते २० फुटी उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील २५ पेक्षा अधिक मंडळांनी उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याच्या दृष्टीने मंडपाची उभारणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सावाचा उत्साह अधिक असून, मागील तीन आठवड्यांपासून ढोल पथकांकडून सरावाचा निनाद कानी पडत आहे. बाजारपेठेतही मखरांचे विविध प्रकार दिसून येत असून, प्लास्टिक फुलांची कलाकुसर केलेले हे मखर स्थानिक कलाकारांकडूनच तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक कलावंतांच्या मखरांनाही पसंती मिळत आहे. याशिवाय थर्माकोलचेही मखर असून, त्यातही यंदा नव्या धाटणीतील कलाकुसर पाहायला मिळत आहे.

गुलमंडीसह शहराच्या विविध प्रमुख बाजारपेठांमध्ये मखरांसह प्लास्टिक फुलांच्या माळा, चांदीचमकीतील चौरंग, गणपती मूर्तींची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत. खरेदीचाही उत्साह असून, गणपती मूर्तींमध्ये सहा इंचापासून ते २० फूट उंचीपर्यंतचे आकार दिसत आहेत. शहरातील छावणी, पदमपुरा, क्रांती चौक, सिडको आदी भागातील मंडळांनी यंदा उंच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल होत असून, गर्दीने रस्ते फुलून गेल्याचे चित्र आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून, यंदाही मोठा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. पोलीस आयुक्तालयात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत.

बंगाली मंडपात देखावे

शहरातील गणपती मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांमध्ये बंगाली ड्रिपिंग कपड्यांच्या पडद्यांचे प्रकार, किल्ल्यांचा साज असलेला महाराजा सेट-अप, वाॅटरप्रूफ मंडप आदी प्रकार दिसून येत आहेत. बंगाली प्रकारच्या मंडपांसाठी कोलकाता आदी ठिकाणांहून कारागीर आणावे लागतात. १५ ते २० रुपये मीटरचा सिफाॅनचा कपडा यासाठी वापराला जातो. मंडपांवर आकर्षक विद्युत रोषणाई असून, यंदा उंच मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या दृष्टीने मंडप उभारणी होत आहे. – रखमाजी जाधव, मंडप व्यावसायिक.