छत्रपती संभाजीनगर : वेरुळ लेणीच्या डोंगरात असलेल्या जोगेश्वरी कुंडात रविवारी एक शिक्षक व एक युवक बुडाला. चेतन संजय पगडे (वय १७) व शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे (वय ३०), अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
दोघेही छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोड परिसरात असलेल्या विटखेड्यातील एका खासगी कोचिंग क्लासेसशी संबंधित आहेत. या कोचिंग क्लासेसच्या ९ विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत शालेय बसने रविवारी वेरूळ लेणीत सहल गेली हाेती. वेरूळ लेणी बघून ते परिसरातील धबधब्याच्या वर असलेल्या जोगेश्वरी कुंडाकडे गेले. यावेळी चेतन पाय घसरल्याने तो जोगेश्वरी कुंडात बुडू लागला. याच वेळी त्याच्यासोबत असलेले शिक्षक राजवर्धन यांनी कुंडात उडी मारली. परंतु दाेघेही बुडाले.
शिक्षक राजवर्धन वानखेडे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावचे मूळ रहिवासी असून ते सध्या विटखेडा येथे राहतात. याबाबत माहिती मिळताच वेरूळ लेणीचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले.