बिपीन देशपांडे

औरंगाबाद : अवघ्या तीस ते चाळीस रुपयांत तीन किंवा चार पोळय़ा, भाजी, कांदा-लिंबू लोणचं, अशा मेनूचे जेवण घेऊन एकवेळचा पोटोबा उरकून घेता येणारी पोळी-भाजी केंद्र अलीकडच्या काळात बंद करण्याकडे कल वाढत चालला आहे. करोनाकाळ आणि त्यानंतरची सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली दरवाढ, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरातील शिक्षण संस्था, शिकवणीवर्ग व स्पर्धा परीक्षांमधील केंद्रांमधील घटती संख्या त्यामागे कारण दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील तीनशेंवर पोळी-भाजी केंद्र बंद झाली असून बहुतांश केंद्र हे महिलांकडून चालवली जात होती. 

मराठवाडय़ातील उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठीच्या शिक्षणाचे औरंगाबाद हे प्रमुख केंद्र. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय विधि विद्यापीठासह काही खासगी विद्यापीठासारख्या बडय़ा शैक्षणिक संस्थाही आहेत. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठीची तयारी करून घेणाऱ्या अभ्यासिकाही आहेत. करोनानंतर बंद पडलेल्या अभ्यासिकाही पुन्हा सुरू झालेल्या आहेत. सैन्य, पोलीस भरतीसाठीही येथे शारीरिक तंदुरुस्तीसह अभ्यासाची तयारी करून घेणाऱ्या संस्थाही येथे सुरू आहेत. औरंगाबादमधील टीव्ही सेंटर परिसरात अनेक अशा संस्था आहेत. यामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी घरगुती जेवणावळ, पोळी-भाजी केंद्रांवर पोट भरण्यासाठी जातात. टीव्ही सेंटर भागात गल्ली-बोळांमध्ये पोळी-भाजी केंद्र आढळून येतात. मात्र, सद्यपरिस्थिती सर्व संस्था कार्यरत असल्यातरी त्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या जवळपास ८० टक्के विद्यार्थी संख्येत घट झाल्याचे काही अभ्यासिका संचालकांचे निरीक्षण आहे. ही परिस्थिती केवळ अभ्यासिकांचीच नाही तर सर्वच शैक्षणिक संस्थांमधीलही असल्याचे सांगितले जाते. जूनमध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या १० हजार ५०९ पैकी ५ हजारांवर उमेदवारांनी पाठ फिरवलेली होती. त्यानंतरच्या झालेल्या परीक्षेतील उमेदवारांच्या संख्येत घटच दिसून आली आहे.

शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचा परिणाम जेवणावळ, पोळी-भाजी केंद्रांवर झालेला दिसून येत आहे. अन्न व औषध विभागाकडे जेवणावळ, पोळी-भाजी केंद्र, उपहार, नाश्ता दुकानांसाठी नोंदणी करावी लागते. त्यांच्याकडे किती पोळी-भाजी केंद्र बंद झाले, याची आकडेवारी नसली तरी शहरात मिळून नऊ हजारांवर लहान मोठे उपाहारगृह, रेस्टॉरन्टसारखी हॉटेल्सची नोंदणी असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाकडून मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात एक हजारांवर जेवणावळी, पोळी-भाजी केंद्राचा आकडा असून त्यातील ३५ ते ४० टक्के या व्यावसायिक दुकानांना टाळे लागले आहे. गहू, ज्वारी, डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के वस्तू व सेवाकर लागलेला असून व्यावसायिक सिलिंडरही बाराशेंवरून वर्षभरात दोन हजारांच्यावर दरात पोहोचले आहे. जवळपास एक हजार रुपयांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. भाजी आणण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचेही दर भडकलेले आहेत. शिवाय ज्यांना स्वत:ची जागा नाही, अशांना व्यवसाय करणे परवडणारे गणित साधणे अशक्य बनले. परिणामी पोळी-भाजी केंद्र, घरगुती जेवणावळी बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय अनेक व्यावसायिकांपुढे राहिला नाही.

औरंगाबाद शहरात हॉटेल, रेस्टॉरन्टची नोंदणीकृत संख्या ३ हजार ४५२ तर ज्यांचा १२ लाखांच्या आतील व्यवसाय आहे, असे ५ हजार ७४३ लहान उपाहारगृह आहेत. नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धत असते. त्यातलीच ही माहिती आहे. बंद केल्याचे फारसे कोणी कळवत नाही.

– निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी.