७१ पुरातन नाणी, सोने-चांदी वस्तू गायब प्रकरण

औरंगाबाद : तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान ७१ पुरातन नाणी, सोने व चांदीच्या वस्तू गायब केल्याच्या तहसीलदारांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी तत्कालीन धार्मिक विभागाचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना रविवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी केलेल्या चौकशीत कोणत्या वस्तू गहाळ झाल्या आहेत याची यादीच केली होती. या प्रकरणात फौजदार कारवाईची आवश्यकताही त्यांनी अहवालात नमूद केली होती. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल होत नव्हता. या प्रकरणी तहसीलदार योगिता सहदेव कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री आरोपी नाईकवाडी यास अटक करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिरातील भाविकांनी अर्पण केलेले सोने, मौल्यवान माणिक, चांदीची बिंदगी, चांदीचे खडाव जोड, उत्सव मूर्ती, चांदीची कडी, म्यानासह तलवार आदी वस्तू गहाळ झाल्याचे एका व्यवस्थापकाकडून दुसऱ्या व्यवस्थापकाकडे पदभार देताना गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशी करून अहवाल दिले होते. दाखल तक्रारीच्या आधारे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी अहवालातून फौजदारी कारवाईच्या शिफारसीनंतर दिलेल्या फिर्यादीमध्ये ५२६ ग्रॅम २५६ मिलीग्राम सोने अणि ६८ किलो ७३० ग्राम ४०० मिलीग्राम चांदी भाविकांनी वाहिलेल्या सोने-चांदी वितळवून घेतल्यानंतर उरल्याचे एका कार्यभार सुपूर्द केल्याच्या पट्टीत नमूद आहे.

या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपीस कोणाचे पाठबळ होते, हे शोधून काढणे पोलिसांसमोरचे आव्हान असणार आहे.