मराठवाडय़ाला विरोधी पक्षनेतेपद; शिवसेनेची नवी खेळी

महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते.

मराठवाडय़ाला विरोधी पक्षनेतेपद; शिवसेनेची नवी खेळी
(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : शिवसेनेतील बंडाळीनंतर ढोलताशांचा गजर व्हावा असे काही घडत नव्हते. ‘गद्दार’ शब्दाचा यथेच्छ उपयोग करत पुन्हा संघटन बांधणीचे प्रयोग सुरू असतानाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबादच्या अंबादास दानवे यांची निवड झाली आणि शिवसैनिकांनी बुधवारी जल्लोष केला.

संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे आणि अब्दुल सत्तार हे पाच आमदार शिवसेना सोडून गेले. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दानवे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि राज्य सरकारचे त्याकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्याचे ठरविले असून अधिवेशनापूर्वी ते नांदेड, िहगोली व विदर्भातील काही जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी बुधवारी औरंगाबाद येथे सांगितले. दानवे हे शिवसेनेतील संघटक नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नाव. ठरावीक कालावधीनंतर शिवसैनिकांना सतत कार्यक्रम देण्यात दानवे हे नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच गेल्या १३ वर्षांपासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद असतानाही सेनेतील तरुणांना वेगवेगळया माध्यमांतून बांधून ठेवण्यात त्यांना यश आले. आरक्षण मागणीसाठी निघालेल्या मराठा मोर्चानंतर औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचे दोन पदर लक्षवेधक आहेत. त्यात धर्माच्या आधारावर होणारे मतविभाजन आणि त्यातील दुसरा भाग हा मराठा व मराठेतर वादाचा. या वादातही अंबादास दानवे यांची भूमिका लक्षवेधक होती. त्यामुळे शिवसेनेतील वाद अधून-मधून चव्हाटय़ावर आले तरी सतत कार्यक्रम आणि संपर्कातून दानवे यांनी शिवसैनिकांना बांधून ठेवलेले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्या महापालिकेतील चुका सुधारण्याचे काम करत दानवे यांनी सेनेची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र सेनेतील नेत्यांमध्ये नाराजी असली तरी ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ता बांधून ठेवणारा नेता अशी दानवे यांची ओळख आहे. कोविडकाळात सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी ते पहिल्यांदा बाहेर पडले होते.

महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केले. समाजशास्त्र, पत्रकारिता, विधि शाखेची पदवी मिळविणाऱ्या दानवे यांनी अनेक आंदोलने केली. ऊस, कापूस या पिकांना भाव मिळावा, जायकवाडीमध्ये हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला. सत्तेत असताना शिवसैनिकांमध्ये भाजप विरोधाची भावना सातत्याने रुजविण्यासाठीही त्यांनी कार्यक्रम दिले. कर्जमाफीच्या आंदोलनात भाजपला घेरण्याच्या भूमिका घेता शिवसेना वाढती ठेवण्यात त्यांची भूमिका नेहमी मध्यवर्ती राहिली. असे करताना शिवसेना नेत्यांना दुखावले तरी त्याची पर्वा न करण्याची वृत्ती त्यांनी बाळगली. शीर्षस्थ नेत्यांना संघटन चालविण्यासाठी लागणारे कार्यक्रम देणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेतील फुटीमुळे निर्माण झालेल्या पोकळीत त्यांना आता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली आहे. मागास मराठवाडय़ातील प्रश्नावर आवाज उठविण्यापासून ते शिवसेनेतील आपल्याच नेत्यांच्या विरोधात ते कशी आणि कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. भाई उद्धवराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांनी तर काही काळासाठी धनंजय मुंडे यांनीही विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. दानवे हे चौथे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे दानवे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्याकडून मराठवाडय़ाच्या आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray nominates ambadas danve as leader of opposition in legislative council zws

Next Story
पाणीपुरवठय़ाच्या योजनेतून मुख्यमंत्र्यांचे राजकीय सिंचन! ; समर्थक आमदारांच्या मतदारसंघांत योजनांवर भर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी