छत्रपती संभाजीनगर : शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, साहित्यिक तथा निवृत्त तहसीलदार प्रभाकर लोणकर (वय ८६) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा वैद्य राहुल लोणीकर, सून, दोन मुली, जावई, नातू, पणतू, असा परिवार आहे.
मूळ लोणी (ता. पाथरी जि. परभणी) येथील असलेल्या प्रभाकर लोणीकर यांनी शंभर पेक्षा जास्त नाटके व एकांकिका केलेल्या आहेत. तसेच मराठी चित्रपट दिसतं तसं नसतं यामध्ये प्रमुख भूमिका केली आहे. एकांकिकेसाठी व नाटकासाठी सर्वोकृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यांचे अनेक पारितोषिके यांना मिळालेली होती. राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शन असे पारितोषिक त्यांना प्राप्त आहेत. १९९५ साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तत्कालीन अध्यक्ष नारायण सुर्वे यांनी विशेष रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच परभणी येथे महसूल कर्मचाऱ्यांनासाठी गृहनिर्माण सोसायटी अंतर्गत १०० पेक्षा जास्त घरे महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या महसूल गृहनिर्माण सोसायटीचे ते सलग १० वर्षे अध्यक्ष होते तसेच महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटनेतील अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.