लातूर शहराला मिरजेहून रेल्वेने पाणी आणणाऱ्या जलदूत रेल्वेची शंभरावी फेरी शुक्रवारी पूर्ण झाली. लातूर शहराला २० एप्रिलपासून २५ लाख लिटर पाणी रेल्वेच्या वाघिणीद्वारे दिले जाते. राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी मंजुरी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या तीन वर्षांपासून लातूरच्या सततच्या दुष्काळामुळे पाणीटंचाईची अडचण दिवसेंदिवस तीव्र होत गेली. २० फेब्रुवारी २०१६ रोजी लातूरच्या नळाला शेवटचे पाणी आले. त्यानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती नसल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. शहराला टँकरने पाणीपुरवठा करताना पाण्याचे स्रोत संपत आल्यामुळे लातूरकरांच्या मदतीसाठी मिरजकर धावून आले.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूरला रेल्वेने पाणी देण्याचे जाहीर केले. त्यासाठी दोन स्वतंत्र रेल्वे उपलब्ध केल्या. १२ एप्रिलपासून ९ दिवस दररोज ५ लाख लिटर पाणी लातूरला मिळाले. त्यानंतर २० एप्रिलपासून दररोज ५० वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी मिळत गेले. मध्यंतरी काही अडचणीमुळे दोन खंड पडले मात्र रेल्वे सुरू राहिली.

३१ जुलपर्यंत रेल्वेने पाणी दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. दुर्दैवाने पाऊस जरी झाला असला तरी मांजरा धरणात अद्यापही पाणी नसल्यामुळे व जलयुक्त लातूर चळवळीच्या माध्यमातून साई व नागझरी बंधाऱ्याचे १८ किलोमीटरचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम होऊनही या क्षेत्रातही पाणी साचले नाही. त्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी ३१ ऑगस्टपर्यंत रेल्वेने पाणी दिले जावे, अशी शासनाकडे व रेल्वे विभागाकडेही विनंती केली. त्यास मंजुरी मिळाली. मोठा पाऊस झाला व मांजरा धरणात पाणी उपलब्ध झाले तरच रेल्वेने पाणी आणणे बंद होईल.

दोन दिवसांपूर्वी कळंब लगत झालेल्या पावसामुळे धरणात काही पाणी आले होते. मात्र, ते काही तासातच जमिनीत मुरले त्यामुळे अजूनही मांजरा धरण कोरडेठाक आहे. लातूर शहराला आतापर्यंत रेल्वेने २३ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने एक्स्प्रेस रेल्वेला जो दर्जा दिला जातो तसा दर्जा जलदूतसाठी दिला असून गेल्या चार महिन्यांत मिरजेहून रेल्वे किती वाजता निघाली व ती कमीत कमी वेळेत लातूरला कशी पोहोचेल यावर रेल्वेचे अधिकारी निगराणी ठेवून आहेत. लातूरला पाणी पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन जी दक्षता दाखवत आहे, त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water railway hundred round completed in latur
First published on: 30-07-2016 at 02:22 IST