जायकवाडीत २ टक्केच साठा 

मराठवाडय़ातील काही जिल्हय़ांत जोरदार पाऊस बरसला असला, तरी धरणांमधील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. अजूनही मराठवाडय़ातील पाणीसाठा केवळ ७ टक्केच आहे. विष्णुपुरी, निम्नदुधना व हिंगोली जिल्हय़ांतील सिद्धेश्वर प्रकल्पात काहीसा पाणीसाठा आहे. जायकवाडी जलाशयात केवळ २ टक्के पाणीसाठा आहे. लातूर, हिंगोली, उस्मानाबाद व नांदेड या जिल्हय़ांत काहीसा पाऊस झाल्याने गेल्या आठवडय़ापेक्षा १२८ टँकर कमी झाल्याची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध आहे. अजूनही मराठवाडय़ात ३ हजार ८४० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नगर व नाशिक जिल्हय़ांत पुरेसा पाऊस झाल्याशिवाय जायकवाडीच्या पाणलोटात पाणी येत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हय़ात ९४९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या, मात्र पाणीपातळीत वाढ होईल, असा पाऊस झाला नाही. अशीच स्थिती जालना जिल्हय़ाची आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील फुलंब्री तालुक्यात अद्याप अनेक गावांमध्ये एकदाही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाऐवजी वाऱ्याचा वेग वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. मराठवाडय़ाच्या पाणीसाठय़ात यवतमाळच्या ऊध्र्व पैनगंगा धरणाचाही समावेश केला जातो. त्यात चांगला पाणीसाठा असल्याने पाण्याची टक्केवारी वाढल्यासारखी दिसते. या धरणात २० टक्के पाणीसाठा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस येईल, असा अंदाज असला, तरी आलेल्या पहिल्या पावसात धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. मोठे तीन-चार पाऊस झाल्याशिवाय टँकरची संख्या कमी होणार नाही. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्हय़ांत टँकरची संख्या अधिक आहे. बीड जिल्हय़ात ८०९ तर जालना जिल्हय़ात ६२२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.