औरंगाबाद जिल्ह्यात एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे हा प्रकार घडला आहे. आंतरजातीय प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या भीमराज गायकवाड याच्या भावानं प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांना होता. त्या संशयातून तरुणीच्या भावांनी  तरुणाच्या कुटुंबियांवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपींनी रागाच्या भरात तरुणाच्या अल्पवयीन भावाची गळा चिरून निघृण हत्या केली. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय १७) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर या हल्ल्यात भीमराज याचे आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रोहिदास देवकर आणि देविदास देवकर अशी आरोपींची नावं आहेत. यातील एकाला खंडाळा तर दुसऱ्याला लाख खंडाळा येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुण-तरुणी बेपत्ता –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींनी अटक केली आहे. बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय २२) हा १२ मार्चपासून बेपत्ता आहे. तर शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची २४ वर्षांची मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे अमोल यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना आहे. या रागातूनच तरुणीचे वडील आणि काकांनी बेपत्ता तरुणाच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.