छत्रपती संभाजीनगर : धाराशिव शहरातील पार्वती रुग्णालय या खासगी दवाखान्यात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी धुडगूस घालत मोडतोड केली. यात रुग्णालयातील साहित्याचे नुकसान झाले. मोडतोड करणाऱ्या अज्ञात तरुणांनी कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली असल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी एकदिवसीय संप करीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
धाराशिव शहरातील रामनगर भागात डॉ. दीपिका सस्ते यांचे पार्वती हॉस्पिटल आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे एक तरुण आई आणि पत्नीसह दवाखान्यात आला. दवाखान्याची वेळ संपली असल्याची सबब त्याला सांगण्यात आली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि तरुणामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर काही अज्ञात तरुणांनी दवाखान्यातील वस्तू आणि एका वाहनाची तोडफोड केली. उपचार देण्यास पार्वती हॉस्पिटलने जाणीवपूर्वक नकार दिल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
दरम्यान, या सगळ्या कृत्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. बुधवारी शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी एकदिवसीय संप पाळला. दिवसभर सर्व खासगी रुग्णालये बंद होती.
डॉक्टरने उपचारास नकार दिला
मंगळवारी रात्री मी माझ्या आई व पत्नीसह पार्वती हॉस्पिटल येथे पत्नीच्या उपचारासाठी गेलो होतो. पत्नीच्या पोटात खूप दुखत असल्याने मी डॉक्टरांना तत्काळ उपचार करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी हे माझे खासगी हॉस्पिटल असून, मी आता रुग्ण तपासणार नाही, असे सांगितले. पार्वती हॉस्पिटल येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना मारहाण केली.
तपासणीची वेळ संपली होती : डॉ. सस्ते
रुग्ण तपासणीची वेळ संपली होती. रुग्ण घेऊन आलेल्या त्या व्यक्तीसह दोघेजण माझ्या रूममध्ये आले. त्यांनी अशी कशी ओपीडीची वेळ संपली म्हणत अरेरावीची भाषा वापरली. मी पेशंट तपासू शकत नाही, असे म्हणताच, सोबतच्या महिलेने कोणाला तरी फोन केला. काही वेळाने दोन-तीन मोटारसायकलवर पाच-सहा व्यक्ती आल्या आणि त्यांनी थेट तोडफोड सुरू केली, अशी माहिती डॉ. दीपिका सस्ते यांनी दिली.