Hsrp number plate: पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रोड (सिंहगड रोड) वरील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवणारे दोन फिटिंग सेंटर अचानक बंद केल्याने वाहन मालकांना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. या केंद्रावर नंबर प्लेट बदलण्यात लोकांना अडचणी येत आहेत. या वाहन मालकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल, पण ते केंद्र कुठे असेल याची माहिती कोणालाही मिळालेली नाही.
सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ एक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट फिटिंग सेंटर आहे. या भागातील वाहन मालकांनी नोंदणी करताना हे केंद्र निवडले होते, पण हे केंद्र अचानक बंद झाले. ६ मार्चनंतर येणाऱ्यांसाठी या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नंबर प्लेट लावली जात नाही. त्या ठिकाणी एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. जेव्हा लोक त्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटस लावण्यासाठी येतात. तेव्हा त्यांना कळते की केंद्र बंद आहे. केंद्र बंद पाहून वाहनचालक नाराज होत आहेत. हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर दोन दिवसांत नवीन केंद्राची माहिती दिली जाईल असे सांगण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांना अनावश्यक अडचणी येत आहेत.
केंद्राचा विस्तार करण्याची सूचना
पुण्यातील २५ लाख वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असेल. त्या तुलनेत, फिटिंग सेंटरची संख्या अपुरी आहे, त्यामुळे आरटीओने संबंधित कंपनीला या केंद्रांचा तात्काळ विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र बंद करण्यामागचे कारण
रोस्मार्टा कंपनीने नंबर प्लेट बदलण्यासाठी शहरात १२५ केंद्रे उघडली होती, यापैकी काही केंद्र डीलर्सनाही देण्यात आली आहेत. जेव्हा वाहन मालक त्या ठिकाणी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी जातात तेव्हा वाद निर्माण होतो. वाहन मालक नंबर प्लेट ब्रॅकेट बसवण्याची मागणी करतात, पण ते वेगळे पैसे देत नाहीत. शिवाय काही वादग्रस्त कारणांमुळे ही केंद्रे बंद केली जात असल्याचे समोर आले आहे.