सध्या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल हळू हळू वाढत आहे. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये देखील अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार्स सादर केल्या होत्या. भारतातच नव्हे तर जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणाऱ्यांना आणि आधीपासून असणाऱ्या मालकांना सुरक्षेची खबरदारी घेणे देखील महत्वाचे असते. इलेक्ट्रिक वाहनांना काही विशिष्ठ परिस्थितीमध्ये आग लागण्याची शक्यता असते. इलेक्ट्रिक वाहनाला लागलेल्या आगीची तीव्रता ही ICE वाहनाच्या आगीपेक्षा जास्त असते.
ईव्ही कार्समध्ये आग लागण्याची अनेक कारणे आहेत कारण या गाड्या विजेवर धावत असतात. या गाड्यांमधील बॅटरी ही प्रचंड हिट निर्माण करते. सुरक्षित ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे हे गाड्यांसाठी अधिक आवश्यक आहे. जर का तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन कुठेही चार्ज करत असाल मग ते घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी. सुरक्षितपणे चार्जिंग करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.
सर्टिफाईड चार्जिंग स्टेशनचा वापर करावा
इलेक्ट्रिक वाहनामध्ये कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून नेहमी सर्टिफाईड चार्जिंग स्टेशनवरच ईव्हीला चार्ज केले पाहिजे. सर्टिफाईड चार्जिंग स्टेशन आणि त्यांचे चार्जर सर सुरक्षा मानकांची पूर्तता करतात. अशा स्टेशनची निर्मिती ही ओव्हरचार्जिंग आणि ओव्हरहाटिंग सारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी डिझाईन केलेले असतात.
अति तापमानात चार्जिंग करणे टाळावे
अति तापमान तुमच्या ईव्ही कारच्या बॅटरी पॅकसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य देखील कमी होऊ शकते. म्हणून जास्त तापमानामध्ये ईव्ही कारचे चार्जिंग टाळणे कधीही चांगले. कडक उन्हामध्ये चार्जिंग करणे टाळावे , कारण उन्हाळ्यामधील उष्णतेचा चार्जिंग सिस्टीम आणि बॅटरीपॅकवर परिणाम होऊ शकतो.
आर्द्रतेच्या ठिकाणी चार्जिंग करणे टाळावे
विजेचा पाण्याशी किंवा पाण्याचा विजेशी संबंध आल्यास शॉक लागण्याची शक्यता असते. म्हणजे सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी उल्केट्रिक वाहने चार्ज करणे टाळले पाहिजे. अशा स्थितीमध्ये चार्जिंग करण्याशिवाय पर्यायच नसल्यास चार्जिंग स्टेशन त्याची केबल यांचा पाण्याशी संपर्क होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.