रॉयल इन्फिल्डची मिटिओर 350 ही क्रुझर बाईक आधीच ग्राहकांना तिच्या दमदार इंजिन आणि फीचर्समुळे भुरळ घालत आहे. आता मेटिओर कुटुंबात आणखी एका दमदार बाईकचा समावेश झाला आहे. कंपनीने इटलीच्या मिलानमध्ये आयोजित EICMA 2022 ऑटो शोमध्ये Royal Enfield Super Meteor 650 या बाईकवरून पर्दा हटवला आहे. बाईकला आकर्षक डिजाईन मिळाले असून नवे फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये ही बाईक सादर केली आहे. एक आहे सुपर मिटिओर ६५० आणि दुसरे आहे सुपर मिटिओर ६५० टुरर. या दोन्ही बाईक जानेवरी २०२३ मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. सुपर मिटिओर ६५० बाइक अस्ट्रल ब्लॅक, अस्ट्रल ब्ल्यू, अस्ट्रल ग्रीन, इंटरस्टेलार ग्रे आणि इंटरस्टेलार ग्रीन या ५ रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे, तर सुपर मिटिओर ६५० टुरर सेलेस्शियल रेड आणि सेलेस्शियल ब्ल्यू या रंगामध्ये सादर करण्यात आली आहे.
(नवीन जीप ग्रँड चिरोकीची बुकिंग सुरू; एडीएएस, सनरूफने सूसज्ज, व्हिडिओमध्ये पाहा दमदार लूक)
इतक्या सीसीचे इंजिन
या बाईकमध्ये कंपनीने आपल्या इंटरसेप्टर ६५० आणि कॉन्टिनेन्टल जीटी ६५० मध्ये देण्यात आलेले इंजिन वापरले आहे. हे इंजिन ६४८ सीसीचे असून ४७ पीएसची शक्ती आणि ५२ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला स्लिपर क्लच असिस्ट ६ स्पीड गेयरबॉक्स जोडण्यात आले आहे.
ब्रेकिंग, सस्पेन्शन आणि किंमत
सुपर मिटिओर ६५० बाइकच्या फ्रंट व्हीलमध्ये ३२० एमएमचा डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे तर मागील व्हीलमध्ये ३०० एमएमचा डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे. या ब्रेकिंग प्रणालीसोबत ड्युअर चॅनल एबीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. बाईकच्या पुढील भागात ४३ एमएम अप साइड डाऊन फोक्स सस्पेन्शन सिस्टम आणि मागे ट्विन गॅस चार्ज शॉक अब्झॉर्बर सस्पेन्श देण्यात आले आहेत. आता चाहते या बाईकला किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सुपर मिटिओर ६५० बाइकची किंमत ३ ते ३.५० लाख (एक्स शोरूम) असण्याची शक्यता आहे.