देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने मारुती, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या वाहन कंपन्यांना मागे टाकले आहे. खरं तर, कंपनीच्या दोन SUV मॉडेल्सनं स्वदेशी कार सुरक्षा रेटिंग कार्यक्रम भारत-NCAP अंतर्गत ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. ही दोन्ही मॉडेल्स हा टप्पा गाठणारी पहिली वाहने ठरली आहेत. भारत-NCAP दोन्ही कारची १५ डिसेंबरपासून क्रॅश चाचणी करत होती.

एका निवेदनात, टाटा मोटर्सने माहिती दिली की, टाटाच्या दोन कारला प्रौढ आणि बालक अशा दोन्ही श्रेणींमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी भारत-एनसीएपी चाचणी दरम्यान जास्तीत जास्त सुरक्षितता रेटिंग मिळवल्याबद्दल टाटा मोटर्सचे कौतुक केले असून नितिन गडकरींनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांना भारत-NCAP प्रमाणपत्र प्रदान केले.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, कंपनीच्या दोन वाहनांना भारत-एनसीएपीकडून ५-स्टार रेटिंग मिळणे हा खरोखरच सन्मान आहे. भारतीय मानकांनुसार वाहनांच्या सुरक्षा प्रणालींचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने ऑगस्टमध्ये भारत-NCAP कार्यक्रम सुरू केला होता. हा कार्यक्रम सर्वोच्च जागतिक सुरक्षा मानकांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

BNCAP क्रॅश टेस्टमध्ये ‘या’ कारला मिळाले 5-स्टार रेटिंग

भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP किंवा BNCAP) च्या पहिल्या क्रॅश टेस्टमध्ये टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्ही कारला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हॅरियर आणि सफारी या दोघांनी अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) साठी ३२ पैकी ३०.०८ गुण आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) साठी ४९ पैकी ४४.५४ गुण तर एसयूव्हीने साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये १६ पैकी १६ गुण मिळवले. त्याच वेळी, फ्रंट ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये, छातीच्या क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी कमी गुण मिळाले यात १६ पैकी १४.०८ गुण मिळाले.या कारमध्ये सात एअरबॅग देण्यात आले आहेत. यातील ६ एअरबॅग्स या ग्लोबल सेफ्टी स्टँडर्डनुसार देण्यात आल्या आहेत.

भारत-NCAP म्हणजे काय?

NCAP हा एक जागतिक वाहन सुरक्षा मान्यता गट आहे, जो अपघाताच्या वेळी वाहनांच्या सुरक्षेसाठी अनेक पैलूंवर आधारित रेटिंग देतो. क्रॅश चाचणीमध्ये ५-स्टार सर्वोत्तम असले तरी वाहन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शून्य स्टार रेटिंग सर्वात वाईट मानले जाते.