टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कारची विक्री करते. टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच टाटाच्या कारचा समावेश असतो. सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जाते. आता टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे.
टाटा मोटर्स आगामी आठवड्यात आपली नवीनतम ऑफर Tata Altroz Racer लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये अल्ट्रोझ रेसर ही अल्ट्रोझ हॅचबॅकची स्पोर्टी आवृत्ती म्हणून सादर केली होती. यावर्षीच्या भारत मोबिलिटी शोमध्ये ते पुन्हा थोड्या वेगळ्या लूकसह प्रदर्शित करण्यात आले. पण टाटाने याच्या लॉन्चबाबत कोणतीही माहिती उघड केलेली नाही. तथापि, आता AutocarIndia ने एका अहवालात पुष्टी केली आहे की, स्पोर्टियर Altroz येत्या काही आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Altroz हा रेसर लाइन-अपचा टॉप-स्पेक प्रकार असेल.
अल्ट्रोझ रेसरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे १.२-लिटर, तीन-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन जे Altroz iTurbo सारखेच आहे. तथापि, ते येथे १२०hp पॉवर आणि १७०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, जे iTurbo पेक्षा १०hp आणि ३०Nm जास्त आहे. खरं तर, ते Nexon SUV सारखंच आहे. Altroz Racer ला iTurbo मध्ये असणाऱ्या ५-स्पीड मॅन्युअल ऐवजी ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल.
(हे ही वाचा: बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात दाखल, किंमत…)
याला स्पोर्टियर हॅचबॅक म्हणून मार्क करण्यासाठी, या कारला काही बाह्य अपडेट्स देखील मिळतील. शोमध्ये दाखवल्या गेलेल्या कारमध्ये बोनेट आणि छतावर दुहेरी रेसिंग पट्टे असलेली ड्युअल-टोन पेंट स्कीम देण्यात आली होती. यात फ्रंट फेंडरवर ‘रेसर’ बॅजिंग, किंचित सुधारित ग्रिल आणि नवीन डिझाइन केलेले १६-इंच अलॉय व्हील्स देखील देण्यात आले होते.
या मॉडेलमध्ये १०.२५-इंच स्क्रीन, सेगमेंट फर्स्ट व्हेंटिलेटेड सीट्स, ३६०-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले आणि व्हॉइस असिस्टेड सनरूफ असण्याचीही अपेक्षा आहे. नंतर, यापैकी काही वैशिष्ट्ये नियमित Altroz वर देखील दिली जाऊ शकतात. रेसर लाइन-अपला ६ एअरबॅग आणि ESC देखील प्रदान केले जातील. तथापि, या अपडेट्सह किमतीत मोठी वाढ होऊ शकते. या कारची किंमत १० लाख रुपयांपासून सुरु होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.