Top 3 Motorcycles Nov 2023: भारतात बाईक चालकांची संख्या खूप जास्त आहे. देशामध्ये दैनंदिन कामांसाठी कोट्यवधी लोक दुचाकीचा वापर करतात. देशातील दुचाकी वाहन बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत बाईक्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतीय बाजारात ग्राहक तीन बाईक्सना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. चला तर नोव्हेंबर २०२३ मध्ये कोणत्या बाईक्सची विक्री मोठ्या प्रमाणात झाली पाहूया…
‘या’ ३ बाईक्सना मोठी मागणी
हिरो स्प्लेंडर
हिरो स्प्लेंडर ही नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल ठरली आहे. तथापि, वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत थोडीशी घट झाली आहे. पण, असे असतानाही या बाईकचे नंबर-१चे स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. हिरो स्प्लेंडरच्या २ लाख ५० हजार ७८६ युनिट्स नोव्हेंबर २०२३ मध्ये विकल्या गेल्या होत्या तर नोव्हेंबर २०२२ मध्ये २ लाख ६५ हजार ५८८ युनिट्स विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच, वार्षिक आधारावर पाहिले तर विक्री ५.५७ टक्क्यांनी कमी झाली आहे.
(हे ही वाचा : नाद करायचा नाय! बाकी कंपन्यांची झोप उडणार, पुढल्या वर्षी दाखल होताहेत ‘या’ ४ स्वस्त कार; एका कारची बुकींगही सुरु)
होंडा शाइन
Honda ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी विक्री करणारी कंपनी आहे. हिरो स्प्लेंडरनंतर होंडा कंपनीची होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर होती. वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत ३५.६४ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. Honda Shine ने नोव्हेंबर २०२२ मध्ये १ लाख १४ हजार ९६५ युनिट्सची विक्री केली होती, जी या वर्षी (२०२३) नोव्हेंबर महिन्यात १ लाख ५५ हजार ९४३ युनिट्सपर्यंत वाढली आहे.
बजाज पल्सर
हिरो स्प्लेंडर आणि होंडा शाइननंतर बजाजची पल्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये एकूण विक्री १ लाख ३० हजार ४०३ युनिट्स होती तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ७२ हजार ७३५ युनिट्सची विक्री होती. म्हणजेच, त्याची विक्री वार्षिक आधारावर ७९.२८ टक्क्यांनी वाढली आहे.