मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी परवाच शाळेचं स्नेहसंमेलन आटोपलं होतं. दीक्षा, श्रावणी आणि निखिल तिघंजण गप्पा मारत बसले होते. अर्थातच गप्पा स्नेहसंमेलनातील कार्यक्रम, त्यामधल्या गमतीजमती, रुसवेफुगवे, गटबाजी, केलेली मज्जा, झालेली फजिती अशा अनेक गोष्टींभोवती फिरत होत्या. पण एकंदर डिसेंबर महिना मस्त असतो असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. कारण परीक्षांची विशेष गडबड नाही आणि स्नेहसंमेलन, क्रीडासप्ताह, ट्रॅडिशनल डे, आजी-आजोबा दिवस वगैरे वगैरे फार मौजमजेचे दिवस हेच तर असतात. जसजशी स्नेहसंमेलनाच्या गप्पांना ओहोटी लागली तसतशा या सर्व विषयांवरच्या गप्पांना जोर चढला. दीक्षा अलेक्झांडर गटात आणि श्रावणी आणि निखिल न्यूटन गटात असल्याने क्रीडा स्पर्धामधली चढाओढ, भांडणं आणि अनेक विषयांवर उलटसुलट चर्चा आणि मतभेद घडले आणि शेवटी विषय निघाला तो वार्षिक पारितोषिक वितरणाचा. या तिघांमध्ये या वर्षी दीक्षाला सर्वात जास्त बक्षिसं आणि प्रमाणपत्रं मिळाली होती तर श्रावणीचं त्याउलट तिला मिळाली होती फक्त सहभाग प्रमाणपत्रं. निखिलचं काय, तो एकदम तटस्थ- सहभाग नाही, बक्षीस नाही हे साधं समीकरण.

पारितोषिक वितरण समारंभाचा विषय सुरू झाला तो पाहुण्यांच्या भाषणापासून. पाहुण्यांनी गुणसूत्रे आणि त्यामुळे आपल्यामध्ये असणारे गुणधर्म, गुणदोष यांबद्दल खूप सुंदर माहिती दिली होती. स्वत:च्या काळ्या रंगावर बोट ठेवत ही गुणसूत्रांची देणगी आहे आणि माझी सर्वाना खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली हीसुद्धा गुणसूत्रांचीच देणगी आहे हे सांगितलं. कोणती देणगी मी कशी वापरायची हे तर माझं कौशल्य. हे सगळं इतक्या रसाळ भाषेत सांगितलं होतं की, तिघांनाही आत्ता बोलताना त्यातला शब्दन् शब्द आठवत होता. ‘‘दीक्षा तुझा राग आहे ना, नाकावर बसलेला- तोही गुणसूत्रांची देणगी आहे हं, पण तू तो वापरू नकोस हं. कारण तो वापरलास की भांडणं होतात. समजलं नं?’’

‘‘हो, हो, माहीत आहे आणि तुझं हे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवणं हे तरी कुठून आलंय माहितीय मला.’’ दीक्षा फणकारली. आता निखिलने ओळखलं, प्रकरण वेगळ्या दिशेने चाललंय. त्याने मुद्दा एकदम दीक्षाच्या बक्षिसांकडे वळवला. दीक्षाने या वर्षी भरपूर बक्षिसं मिळवली होती आणि त्याबद्दल त्याला खरंच कौतुक वाटत होतं. तिने ते कसं साध्य केलं याबाबत त्याला खूप उत्सुकता होती. आणि पुढल्या वर्षी जर का ती अशीच बक्षिसं मिळवू शकली तर शाळेतील विद्यार्थीनींमध्ये उत्कृष्ट लेखिका हा मान तिला नक्कीच मिळेल याची निखिलला खात्री होती. हे सगळं त्याने बोलून दाखवल्यावर श्रावणीचा पापड मोडला. ‘मला या वर्षी बक्षीस नाही’ याची तिला खंत होतीच, ती आणखी तीव्र झाली.

ती एकदम गप्पच झाली. बाकीचे दोघेही दीक्षाच्या पुढील वर्षीच्या स्पर्धाबाबत आणि त्यांच्या तयारीबद्दल बोलू लागले. पण श्रावणी आपली ढिम्म. खूप वेळाने निखिल आणि दीक्षाच्या हे लक्षात आले. त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले, पण श्रावणीचं हूं नाही की चूं. आता आली का पंचाईत. आपल्याकडून कोणती चूक झाली ते कळलं नाही तर ती चूक कशी सुधारणार, हा प्रश्न दोघांनाही पडला. इतक्यात निखिलची ताई- धनश्री काहीतरी विचारायला त्यांच्यापाशी आली. निखिलने आपला हा जटिल प्रश्न ताईपुढे मांडला. धनश्री आता वकील होणार होती. त्यामुळे तिने वेगवेगळे प्रश्न विचारून श्रावणीकडून अचूक माहिती मिळवली. आपल्याला फक्त सहभाग प्रमाणपत्रेच मिळाली याची श्रावणीला बोच होती. त्यावर धनश्री म्हणाली, ‘‘श्रावणी, मला तुझं वाईट वाटणं समजतंय. पण आता आपण एक वेगळा विचार करू. या सगळ्या सहभागातून तुला नवनवे मित्रमत्रिणी मिळाले का?’’

‘‘हं’’ श्रावणीचं एकाक्षरी उत्तर.

‘‘बरं, आमचा निखिल कुठे भागच घेत नाही त्यामुळे त्याला काहीच मिळालं नाही, त्याच्यापेक्षा तर तुझ्या प्रमाणपत्रांची संख्या जास्त आहे.’’

श्रावणीचं पुन्हा ‘‘हं’’च.

‘‘आता असा विचार कर बरं, या सगळ्यातली कोणती स्पर्धा तुला अधिक आवडली?’’

‘‘गाण्याची.’’ निखिल आणि दीक्षाचं एकत्र उत्तर. कारण गाण्याचा स्पर्धेत श्रावणीने खूप आनंद लुटला होता. पण काही तांत्रिक चुकांमुळे तिला विजेतेपद मिळालं नव्हतं एवढंच. ‘‘आणि कथाकथन.’’ निखिल जोरदार टाळी वाजवत खो खो हसत सुटला.

‘‘ताई, हिने एका गोष्टीचा पहिला भाग आणि दुसऱ्या गोष्टीचा उरलेला भाग सांगितला माहितीय.’’परत निखिल-दीक्षाचं जोरजोरात हसू. नकळत श्रावणीही आपला रुसवा विसरली. आणि तीही गालातल्या गालात हसली. याचा फायदा घेत धनश्रीताई म्हणाली, ‘‘श्रावणी, तू फक्त स्पर्धेचा बक्षिसं, प्रमाणपत्र, सत्कार एवढाच विचार केलास. आमचा निखिलही तसाच करतो म्हणा! पण शाळेतल्या या स्पर्धा यापेक्षा खूप काही शिकवतात. मित्रमत्रिणी कसे जमवायचे, समाजात कसं वागायचं, अपयश कसं पचवायचं, यशालाही कसं सामोरं जायचं वगैरे.. त्याबरोबरच अजून एक आहे, आपली आवड कशात आहे आणि नावड कशात आहे हेही यातून समजतं. म्हणजे बघ हं, तुला गाणं आवडतं. पण सराव कमी पडला असेल किंवा तू काही गोष्टींचा विचार केला नसशील म्हणून तांत्रिक बाबीत कमी पडली असशील. त्यावर जर का तू विचारपूर्वक प्रयत्न केलेस तर तू गाण्याची सर्व बक्षिसं पुढच्या वर्षी नक्की पटकावशील, तेच कथाकथनात.’’

‘‘आणि अजून एक सांगू का, तू निखिलकडे बघ. त्याची भाषा, वागण्याबोलण्याची पद्धत, समाजात वावरण्याची पद्धत हे सारं तुझ्याएवढं चांगलं नाहीय, कारण तू स्पर्धेच्या निमित्ताने हे सारं नकळत शिकतेस. तो तर भागच घेत नाही.’’ आता मान खाली घालण्याची पाळी निखिलची होती.

‘‘हो ताई’’ श्रावणीने तिच्याही नकळत होकार दिला. कारण तिला स्पर्धेतील सहभागाचं महत्त्व मनापासून पटलं होतं. या नवीन वर्षांत स्पर्धेचा आणि यशाचा हा वेगळ्या प्रकारचा विचार करायचा हे सर्वाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ते पाहून धनश्रीताई समाधानी झाली आणि निखिलला काय विचारायला आलो होतो ते विसरूनच परत जाण्यासाठी वळली. जाताना ती सहज गुणगुणली, ‘‘मला सांगा, यश म्हणजे नक्की काय असतं?’’ त्याला जोड देत श्रावणी तालासुरात म्हणाली, ‘‘सहभागी झाल्याने जे आपल्यामध्ये घडतं..’’

joshimeghana231@yahoo.in

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about success means
First published on: 06-01-2019 at 00:39 IST