गेल्या काही भागांत आपण ज्या कमांड्स (commands) शिकलो, त्या कमांड्स दिलेल्या अटीनुसार प्रोग्रामचा कोणता भाग execute करायचा किंवा तो किती वेळा execute करायचा, हे ठरवतात. यासाठी आपण तुलना करणारी चिन्हं (comparison operators) वापरली. उदाहरणार्थ, “if N1 > N2” dIaYUF “while Chances > 0” पण दर वेळेला अटी एवढय़ा सोप्प्या असतील असं नाही. कधी कधी अशा छोटय़ा छोटय़ा वेगवेगळ्या अटी एकत्र करून if/while मध्ये वापरायची किचकट अट बनवली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूलभूत गणिती चिन्हं व तुलना करणारी चिन्हं तुम्ही एरवीसुद्धा वापरता. ती प्रोग्राममध्ये कशी वापरली जातात तेही आपण बघितलं. आज आपण अटी जोडायला जी चिन्हं वापरली जातात ती शिकूया. त्या आधी आपण त्यासाठी लागणारा एक डेटा टाइप बघू या.

तुम्हाला आठवत असेल, प्रोग्राममध्ये व्हेरिएबल (variable) वापरायच्या आधी ते डिक्लेअर (declare) करावं लागतं. काही काही प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचा डेटा टाइपही डिक्लेअर करावा लागतो. उदाहरणार्थ, नाव व जन्मतारीख साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी व्हेरिएबल्स अनुक्रमे String U Date या टाइपची असतील.

एखादी अट पूर्ण होते आहे की नाही ही माहिती साठवून ठेवण्यासाठी बूलिअन (boolean) हा डेटा टाइप वापरला जातो. या डेटा टाइपमध्ये ‘‘बरोबर’’ व ‘‘चूक’’ (true and false) या दोनंच किमती येतात. अट पूर्ण होते आहे की नाही हे जरी आपण एखाद्या व्हेरिएबल साठवून ठेवलं नाही तरी ज्या कमांडमध्ये ती अट वापरली आहे, तिथे त्याचा अर्थ  ‘‘बरोबर’’ किंवा ‘‘चूक’’ असा बूलिअन डेटा टाइपनुसारच लावला जातो. उदाहरणार्थ,  “if N1 > N2” किंवा “while Chances > 0”  म्हणजेच “if ((N1 > N2) == true)” किंवा “while ((Chances > 0) == true)”.

आता आपल्याला बूलिअन स्वरूपातल्या दोन अथवा जास्त अटी जोडायच्या असतील, तर आपल्याला काय करावे लागेल? अटी जोडायच्या दोन मूलभूत तार्किक क्रिया (logical operators) आहेत. “and” नि “or” बहुतेक प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये त्या अनुक्रमे && व ।। या चिन्हांनी दर्शविल्या जातात.

समजा, आपल्याकडे दोन अटी आहेत. त्या अटी पूर्ण होतात की नाही ही माहिती आपण C1 व C2 या दोन बूलिअन व्हेरिएबल्समध्ये साठवून ठेवली आहे. आता आपल्याला C1 व C2 या दोन्हीवर आधारित संयुक्त अट बनवायची आहे.

“and” वापरून जर दोन अथवा दोनपेक्षा जास्तं अटी जोडल्या, तर त्या सर्वच्या सर्व अटी true असतील, तर आपली संयुक्त अट true असेल. “or” वापरून जर दोन अथवा दोनपेक्षा जास्तं अटी जोडल्या, तर त्यापैकी कोणतीही एक अट true असेल, तर आपली संयुक्त अट true असेल.

दोनापेक्षा जास्तं अटी असतील नि त्या जोडताना आपण काही ठिकाणी “and” वापरलं नि काही ठिकाणी “or” वापरलं तर काय होईल? बूलिअन हा डेटा टाइप व तार्किक क्रिया आजच नव्याने शिकलोय. त्यामुळे आज एवढंच पुरे. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात बघूया.

अपर्णा मोडक

sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं  http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

 

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on boolean data type
First published on: 17-09-2017 at 01:05 IST