आज आपण एका अनोख्या माशाची माहिती घेऊ. हा मासा अजिबातच माशासारखा दिसत नाही; इतर माशांसारखे याच्या अंगावर खवले नसतात, की त्यांच्यासारखी याची शेपटी दुतोंडी नसते. रंग बदलणाऱ्या सरडय़ासारखी, टोकाकडे चकलीसारखी वेटोळी अशी याची शेपटी असते. कांगारूंसारखी पिसांसाठीची एक पिशवी असते आणि घोडय़ासारखी मान असते. ओळखू आलं तुम्हाला आज आपण कुणाविषयी वाचणार आहोत?- समुद्री घोडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्री घोडय़ांच्या शरीरावर एकमेकांमध्ये गुंतणाऱ्या हाडांसारख्या कठीण चकत्यांपासून बनलेली तब्बल ४५ वलयं असतात आणि त्यापुढे चिमुकली शेपटी असते. या शेपटीच्या साहाय्यानेच हे समुद्री घोडे समुद्रीशैवालाला धरून राहतात. गंमत म्हणजे, सरडय़ाप्रमाणेच यांचा प्रत्येक डोळा स्वतंत्रपणे हालचाल करू शकतो. लांब नळीसारख्या तोंडामध्ये दात नसतात. मात्र, समुद्री घोडे एम्फिपॉड्स या करंदीसारख्या प्राण्यांवर गुजराण करतात. पोहताना कल्लय़ांनजीक असणाऱ्या चिमुकल्या आणि पारदर्शी परांच्या साहाय्याने समुद्री घोडे आपला तोल सांभाळतात. पाठीवरचा पर, जो प्रामुख्याने पोहण्याकरता कामी येतो, तो सेकंदाला ३५ वेळा फडफडतो- उभ्या उभ्या पोहण्याची यांची पद्धत गंमतशीर आणि अनोखी आहे हे नक्की.

समुद्री घोडे प्रजननाच्या बाबतीतही सगळ्यांहून निराळे आहेत. छोटय़ा पिलांना आई नव्हे तर वडील जन्म देतात. नर म्हणजेच वडील समुद्री घोडय़ांच्या पोटावर एक पिशवी असते ज्यामध्ये मादी अर्थात आई समुद्री घोडा आपली अंडी घालते. साधारण ३० ते ५० दिवसांनी वडील एक-दोन नाही तर २०० चिमुकल्या पिलांना जन्म देतात. दहा-वीस पिलांच्या एकेका गटामध्ये अशी साधारण दोन दिवसांमध्ये सगळी पिलं जन्माला येतात.

शब्दांकन : श्रीपाद ऋषिकेश चव्हाण

rushikesh@wctindia.org

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on seahorse fish
First published on: 05-11-2017 at 01:50 IST