|| सुचित्रा साठे

‘‘अगं आजी, काल मी बाबांबरोबर येत होतो ना, तेव्हा एक पाय नसलेला माणूस पाहिला. हातावर जोर देऊन तो पुढे सरकत होता. बापरे! त्याला तसं बघून मला खूप वाईट वाटलं गं..’’  या क्षणीही तो माणूस जणू समोर आहे की काय, अशा भावनेनं थोडीशी भीती, थोडं आश्चर्य, थोडी वेदना अमोलच्या चेहऱ्यावर उमटली होती.

‘‘मग काय झालं पाय नसला तर?’’ आजीने हेतुपुरस्सर त्याला टोकलं.

‘‘मग चालणार कसं?’’ अमोल पटकन् म्हणाला. पण मग लगेचच त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, ‘‘आजी, मला माहिती आहे की मी चालायला तयार नसतो, नेहमी गाडीसाठी अडून बसतो, म्हणून तू असं मुद्दाम म्हणते आहेस.’’

‘‘म्हणजे पायांनी चालायचं असतं हे तुला कळलंय तर!’’ आजीने हळूच चिमटा काढला.

‘‘आजी, आपला अपूर्व कसा सुट्टा उभा राहिला नं परवा.. त्याला काहीतरी वेगळंच घडल्याचं जाणवत होतं. म्हणून आपल्याकडे बघत कौतुकाने स्वत:च टाळ्या वाजवत होता तो.’’ सईला अपूर्वशिवाय काही सुचत नव्हतं.

‘‘त्याने चालावं म्हणून आपण सगळ्यांनी ‘चाल चाल मोते, पायी मोडले काटे’ अशी मस्त रेकॉर्ड लावली. आईने घुंगरू लावलेले वाळे घातले.. बाबांनी रंगीत खेळणं आणून समोर लांब ठेवलं.. वाजणारे बूट घातले.. आणि अपूर्वने खरोखरच चार पावलं टाकली. सगळ्यांना किती आनंद झाला त्यावेळी. मग पडला, रडला, तरी अपूर्व चालतच राहिला. त्याला मग तो चाळाच लागला.’’ मेधाताईही अपूर्वभोवतीच घुटमळत होती.

‘‘तर ही पावलं देहाचा भार सांभाळत चालत राहतात. आधी घरात, मग घराबाहेर. योग्य वेळी शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा राजमार्गाकडे वळतात. काही पावलं वाकडी वाट करून ‘नवीन’ वाट शोधतात. ‘पादस्पर्श क्षमस्व मे’ अशी धरणीमातेची क्षमा मागूनच सर्वाचा दिवस सुरू होतो..’’ आजीने विषयाचा पाया रचला.

‘‘आजी, काही पावलं मॅरेथॉन धावायला जातात, तर काही डोंगरदऱ्या चढून जाण्याच्या प्रस्तरारोहणाच्या मार्गावर गतिमान होतात. माझ्या मैत्रिणीचे वडील दरवर्षी हिमालयात जाऊन येतात. ते टॉनिक त्यांना वर्षभर पुरतं म्हणे!’’ आत्ताच मॅरेथॉनमध्ये धावून आलेल्या सईने अभिमानाने सांगितलं.

‘‘आम्ही कुलू-मनालीला गेलो होतो ना, तेव्हा बर्फावर स्केटिंग केलं होतं. तेव्हा मेधाताई घाबरत होती..’’ अमोलने मेधाताईला अंगठा दाखवीत आपलं घोडं पुढे दामटलं.

‘‘अन्यायाने पेटून उठणारी पावलं संघटित होतात, पदयात्रा काढतात. काहींच्या पावलांना तर अक्षरश: भिंगरी लागलेली असते. मनात काहीएक उद्दिष्ट, ध्येय ठरवून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असते. स्वामी विवेकानंद, समर्थ रामदासस्वामी यांनी बारा वर्षे भारतभर पदभ्रमण केलं आणि समाजजीवन जवळून अभ्यासलं होतं..’’

– इति आजी.

‘‘आणि नृत्यकला तर सर्वस्वी पावलांवरच.. म्हणजेच पायांवरच अवलंबून असते. नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी कृत्रिम पाय बसवून जिद्दीने आपली कला जिवंत ठेवली. इतकं मस्त वाटतं नृत्य करताना! छान व्यायाम होतो.’’ सई पदन्यास करण्यात गुंग झाली.

‘‘देशप्रेमाने भारावलेली पावलं सैन्यदलात दाखल होतात. कडक शिस्त, नियमांचं पालन करत डोळ्यांत तेल घालून आपल्या सीमारेषेचं संरक्षण करतात, प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान देतात,’’ असं आजीने सांगताच सगळेच भारावले.

‘‘आजी, या वर्षी सोसायटीच्या स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या नात्यांतील मैत्र दाखवत सगळ्यांनी कॅटवॉक केलं होतं.. फॅशन शोमध्ये करतात ना तसं!’’ सईला आईबरोबर ‘माय-लेकी’ म्हणून मिरवत पावलांची करामत दाखवायची संधी मिळाल्यामुळं तिला ते बरोब्बर आठवलं.

‘‘चित्रपटात कधी कधी पडद्यावर नुसतीच पावलं दाखवतात. ‘त’वरून ताकभात त्याप्रमाणे त्या, त्या पावलांवरून जणू त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.’’ मेधाताईने जरा वेगळी गोष्ट नजरेस आणून दिली.

‘‘संतमहात्म्यांची पावलं पूजनीय असतात. गजानन महाराजांच्या किंवा समर्थाच्या पादुकांच्या दर्शनाला आपण जातोच ना! वारीमध्ये वारकरी प्रत्येकाच्या पायावर अपार श्रद्धेनं डोकं ठेवतात. जरा पौराणिक काळात डोकावून बघा मेधाताई..’’ – इति आजी.

‘‘हो आजी, आठवलं. भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं. वामन अवतारातील तीन पावलं सर्वश्रुत आहेतच.’’

‘‘दैनंदिन जीवनात या पावलांचा आपण अनेक वेळा सन्मान करतो. लग्नात सप्तपदीची सात पावलं चालल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही. लग्नानंतर गृहप्रवेश करताना नववधूच्या पावलांना लक्ष्मीची पावलं मानून धान्याच्या मापाला पाय लावून ओलांडण्याचा विधी आहे. गणेश चतुर्थीला गणपती घेऊन येता तेव्हा आठवतंय ना अमोल, तुझ्या पायावर दूध-पाणी घातलेलं? देवासमोरील रांगोळीत आपण गोपद्म काढतो. जंगलातील प्राण्यांच्या पावलांच्या ठशांना जंगलभाषेचा दर्जा दिला जातो. पावलोपावली जाणीवपूर्वक आपण पावलांना महत्त्व देतो, त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो. त्यांच्यामुळेच आपण पायावर उभे आहोत, हे मान्य करायलाच हवं. आपण या पायांचे लाड कसे करतो सई, सांग बरं.’’

‘‘आपल्या अपूर्वचे आहेत तसे वाळे, तोरडय़ा, छुमछुम घुंगरू घालतो. शिवाय मेंदी, नेलपॉलिश लावतो. ब्युटी पार्लरमध्ये पेडीक्युअर करून घेता येतं. दुखलंखुपलं की कैलास जीवन, अमृत मलम लावतो.’’-  इति सई.

‘‘आणि अमोल, तू काय घालतोस पायाला काही टोचू नये म्हणून?’’ आजीने अमोलचं लक्ष वेधून घेतलं.

‘‘आजी, पायमोजे, चप्पल, बूट आपण बाहेर जाताना घालतोच, पण घरात सपाताही घातल्या जातात. माझ्याकडे तर चप्पल, बुटांचे खूप जोड आहेत.’’ अमोल ते मोजण्यात गर्क झाला.

‘‘घरात येताना चप्पल, बूट दारात काढून ठेवून आणि पाय धुऊनच आपण घरात येतो. शरीराच्या इमारतीचा हा पाया मजबूत राहावा म्हणून आपण काळजी घेतो. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘पायातली वहाण पायातच बरी’, ‘पायात पाय घालणे’ असे गाणी, म्हणी, वाक्प्रचार यांच्यामधून पावलांनी मराठी भाषेत पाय रोवलेला आहेच. मग निघणार ना त्यांच्या शोधमोहिमेवर? तोपर्यंत अमोलला चालायला शिकवते.’’

‘‘आजी, तू म्हणजे ना..’ म्हणत अमोलने आजीचं बोट पकडलं.

suchitrasathe52@gmail.com