‘‘अवंती, ए अवंती, बास झालं आता खेळणं. अंधार पडला बघ. घरी ये लवकर.’’ खिडकीतून बाहेर बघत आईनं अंगणात खेळणाऱ्या लेकीला हाक मारली. हिरमुसली होऊनच अवंती घरी आली. अजून कितीतरी खेळायचं बाकी होतं. ‘चल. हातपाय धू आणि कपडे बदल. अभ्यासाला बस लगेच.’’ आईनं पुन्हा बजावलं.
अवंती रुसून तिच्या खोलीत गेली. ‘‘काय सगळे नुसते मागे लागतात. हेच कर आणि हेच करू नकोस. आजी काय म्हणते बरं… ‘लहानपण देवा देगा, मुंगी साखरेचा रवा.’ मुंगी छोटी तर तिला खायला साखर मिळते. पण मीपण लहानच आहे की. मग सारखे सगळेजण मला का बोलतायत? मीही आता मुंगी एवढी लहान होऊ की काय?’’
अवंती अभ्यासाचं पुस्तक काढून बसली खरी, पण पुस्तक वाचता वाचता तिचा डोळा लागला आणि चक्क तिला दिसल्या मुंग्या. तिच्या टेबलाच्या मागून येऊन खिडकीतून बाहेर जात होत्या. केवढी भलीमोठी रांग होती! अवंतीला हसू आलं. ‘‘आताच बोलले आणि लगेच समोर मुंग्या हजर. यांना शंभर वर्षे आयुष्य आहे. ’’
तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, ‘‘काय? शंभर वर्षं? इतका वेळ नाहीये आपल्याकडे. चल, पळ, पळ; खूप कामं करायची आहेत घरी जाऊन.’’ तिनं आजुबाजूला पाहिलं तर सगळेजण धावत होते, पण शिस्तीने. कुणीही धक्काबुक्की करत नव्हतं की आरडाओरडा करत नव्हतं. सगळे एकमेकांचा फक्त उत्साह वाढवत होते. एकंदर ते सर्वजण खूप बिझी होते असं दिसत होतं. त्यातले काहीजण मोठं वजन घेऊन जात होते. तर काहीजण रिकामे होते, पण ते काहीतरी आणायला जातायत असं वाटत होतं.
नकळत अवंतीपण त्यांच्या रांगेत धावायला लागली. पळता पळता तिची दमछाक झाली. अवंती स्वत:च्या तंद्रीत असल्यामुळे तिचा कुणालातरी धक्का लागला. तिनं दचकून वर पाहिलं तर काय? ती एक मुंगी होती. अवंतीच्या धक्क्यानं तिच्या जबड्यातला साखरेचा कण खाली पडला होता. अवंतीला काही कळेना. ती घाबरली. ‘‘बाप रे! मी इतकी छोटी कशी झाले? माझे आई -बाबा कुठे आहेत?’’ तिला रडू यायला लागलं. ‘‘सॉरी मुंगीताई. माझ्यामुळं तो साखरेचा कण खाली पडला ना? मी उचलते. पण सांग ना माझे आई-बाबा कुठे आहेत?’’
‘‘असू दे अवंती. मी उचलते. तू रडू नकोस. तुला तुझे आई- बाबा भेटतील. आता तू आमच्या वारुळाजवळ आली आहेस तर ये. तुला ते दाखवते.’’ साखरेचा कण उचलता उचलता ती मुंगी म्हणाली.
‘‘मुंगीताई, तुला माझं नाव कसं माहीत?’’ अवंतीचाप्रश्न ऐकून मुंगीताई नुसतीच हसली. मग दोघीही वारुळाकडे धावायला लागल्या. इतर मुंग्यांचे या दोघींकडे अजिबात लक्ष नव्हतं, ते पाहून अवंतीला खूप आश्चर्य वाटलं.
‘‘मुंगीताई, तुम्ही सगळ्या सारख्या धावत का आहात?’’
मुंगीताईला हसू आलं. ती म्हणाली, ‘‘अगं, आम्ही नेहमी अशाच धावत असतो, कारण आम्हाला स्वस्थ बसायला मुळीच आवडत नाही. ‘आळस’ असं काहीतरी तुम्ही माणसं म्हणता ना ते काय असतं आम्हाला माहीतच नाही. आणि आम्हाला कामंही खूप असतात. इथं बोलत बसून वेळ घालवण्यापेक्षा चल वारुळात. तिथं कळेलच तुला आम्ही काय काय करतो ते.’’
मग मुंगीताई तिला तिच्या मोऽऽठ्ठ्या घरात घेऊन गेली. त्याला इतके सारे दरवाजे, आत जायला इतके सगळे रस्ते. आणि एकही रस्ता मोकळा नव्हता हं. मुंगी म्हणाली, ‘‘थांब. माझ्यामागूनच ये. नाहीतर हरवशील कुठंतरी.’’ पण अवंतीचं लक्षच नव्हतं. ती वारुळातले रस्ते, डोंगरातल्या गुहांसारख्या दिसणाऱ्या खोल्या, मुंग्यांची चाललेली लगबग हेच बघत बसली होती.
‘‘ओ माय गॉड! कसलं भलंमोठं घर आहे ग तुझं. इतक्या सगळ्या खोल्या? सांभाळून तरी कशा ठेवता इतक्या साऱ्या कुलूप -किल्ल्या?
‘‘अवंती, आम्ही लाखो मुंग्या इथं राहतो, तर एवढं मोठं घर नको? त्यामुळे तू याला आमचं घर म्हणण्यापेक्षा वसाहत म्हणू शकतेस. म्हणजे कॉलनी. आता आम्ही कशा, कुठं राहतो, काय काय कामं करतो ते तुला दाखवते. चल आतमध्ये.’’
‘‘पण मुंगीताई, तुला खूप कामं असतील ना गं? माझ्याबरोबर फिरण्यात तुझा वेळ नाही का जाणार?’’ अवंतीनं अगदी शहाण्या मुलीसारखं विचारलं.
‘‘तुला सगळं दाखवता दाखवता मी माझी कामं करत राहीन. मग तर झालं?’’
‘‘आधी हा साखरेचा कण ठेवायला जाऊया.’’
‘‘बाप रे किती अंधार आहे इथे! ट्रेन बोगद्यातून जाते तेव्हा असा अंधार दिसतो. खूप लांब जायचंय का? इतक्या मिट्ट काळोखात मला बाई वाटते भीती. मुंगीताई, तुम्ही सगळ्या किती शूरवीर आहात!’’
‘‘ही बघ आमची कोठीची खोली. म्हणजे स्टोअर रूम. इथे आम्ही आमचं अन्न साठवतो.’’
‘‘हे काय काय आहे? या तर झाडांच्या बिया आहेत. ही साखर आणि हे काय आहे गं, मुंगीताई?’’
‘‘हा फुलांमधला गोड रस आहे मधासारखा आणि ही आहे बुरशी.’’
‘‘हे सगळं खाता तुम्ही?’’
‘‘हो. पण आमच्या काहीकाही मैत्रिणी कीटकपण खातात. पण या वारुळात आम्ही नाही खात कीटकांना. आम्हीपण कीटकच. कारण आम्हाला सहा पाय आहेत.’’
‘‘तुला माहीत आहे का अवंती, आम्ही सर्वांत जुने कीटक आहोत या पृथ्वीवरचे. म्हणजे तुम्ही माणसं असण्याच्या कोटी वर्षं आधी.’’
‘‘कोटी! म्हणजे एकावर किती शून्य बरं?’’ अवंती मोजू लागली.
‘‘आता ही बघ. इथे छोटी छोटी बाळं झोपलीयेत. पाहिलीस का? इथे आम्ही या बाळांची काळजी घेतो.’’
‘‘आधीच या मुंग्या इवल्याशा. मग त्यांची बाळं किती चिमुकली असतील?’’ अवंतीला गंमत वाटली.
‘‘ मुंगीताई, पण मग तुम्ही तुमची कामं वाटून घेता का?’’
‘‘हो तर! आम्हीही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतो. काही छोट्या, काही मोठ्या. काही चिडक्या चावणाऱ्या, तर काही आमच्यासारख्या शांत. पण एका प्रकारच्या मुंग्याच नेहमी एकत्र म्हणजे एका कॉलनीत राहतात.’’
‘‘आता आमच्याच कॉलनीचं बघ ना. आम्ही सगळ्या तुला एकसारख्या दिसतो की नाही?’’
‘‘हो. अगदी सारख्या. मला मगाशीच प्रश्न पडला, तुम्ही एकमेकींना ओळखता कसं? आणि सगळ्याजणी कशा एका रांगेत शिस्तीत चालता? आम्हाला शाळेत बाई करायला सांगतात तसं.’’
‘‘आमच्या शरीरात काही पदार्थ असतात त्यामुळे करू शकतो आम्ही हे.’’
‘‘आता कुठे जातोय आपण मुंगीताई?’’
‘‘आता आपण जातोय राणी मुंगीला भेटायला.’’
‘‘कोण? राणी मुंगी? म्हणजे क्वीन? ती कुठे असते? ती सिंहासनावर बसलेली असते का? आणि डोक्यावर मुकुट?’’ हे ऐकून मुंगीताईला हसूच आलं.
‘‘आणि तुम्हाला सारखी सांगत असेल ना, हे करा आणि ते करा आणि शिक्षापण करत असेल.’’
‘‘आम्हाला आमची कामं बरोबर माहीत असतात. काहीच सांगावं लागत नाही.’’
‘‘मग मुंगीताई, तू का नाही राणी होत?’’
‘‘अगं तसं नसतं. असं कुणालाही राणी होता येत नाही. राणीमुंगीपण आमच्यातलीच असते. फक्त जरा वेगळी.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘दाखवते. ही बघ राणीमुंगीची खोली. सावकाश हं. ती झोपली असेल.’’
‘‘पाहिलंस, राणी मुंगी थोडी मोठी आहे किनई? आणि फक्त तीच बाळांना जन्म देऊ शकते.’’
‘‘आणि राजापण असतो का?’’
‘‘हो असतो, पण तो जास्त जगत नाही. त्यामुळे राणीच मुख्य.’’
‘‘अच्छा! असं का? मग तुम्ही सगळ्या कोण आहात?’’
‘‘आम्ही सगळ्या कामकरी मुंग्या. अन्न गोळा करायचं, बाळांना सांभाळायचं, वारुळ बांधायचं, त्याची साफसफाई करायची ही सगळी कामं आम्ही करतो. वारुळाचं रक्षण करायला शिपाई मुंग्यापण असतात.’’
‘‘ही कामं करायचा तुम्हाला कंटाळा नाही येत?’’
‘‘मुळीच नाही. ते आमचं काम आहे. मग मन लावूनच करायला पाहिजे ना? कंटाळा करून कसं चालेल?’’
‘‘हो गं. बरोबर आहे तुझं. तुम्ही एवढेसे कीटक, पण आम्ही माणसांनी तुमच्याकडून खूप शिकायला पाहिजे. बरं आता मी घरी जाऊ का?’’
‘‘हो. आई-बाबा वाट पाहात असतील ना? मी येऊ का सोडायला?’’
‘‘जाईन मी एकटी-एकटी. माझी अंधाराची भीतीपण पळून गेलीय आता.’’ अवंतीनं मुंगीला शेकहॅण्ड केला. ‘‘बाय मुंगीताई. एवढं काम करता, शिस्त पाळता, एकत्र राहता. मी आई-बाबा आणि आजी-आजोबांना नक्की सांगेन, मुंगी छोटी असली म्हणून काय झालं, तिला काही उगाच मिळत नाही साखरेचा रवा.’’
‘‘बाय बाय’’असं म्हणत अवंती एकदम दचकून उठली. ते स्वप्न होतं की ती खरंच मुंगीबरोबर वारूळ बघायला गेली होती ते तिला कळलंच नाही.
‘‘चला, आता मनापासून जोरदार अभ्यास करायचा.’’ अवंतीनं जीवशास्त्राचं पुस्तक पुन्हा उघडलं.
bhagwatswarupa41@gmail.com