मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काही अर्थ नाही’ हे वाक्य अनेक लहानथोर सहजच फेकताना दिसतात. शालेय अभ्यासात काही अर्थ नाही. परीक्षा, निकाल, स्पर्धा यांबाबतीत असं म्हणणं असतंच, पण बरोबरीने सराव, रियाज यासाठीही असं म्हटलं जातं आणि हा मोठ्ठा हितशत्रू आहे हे सतत जाणवतं. हे असंच चालू राहिलं, ते मनात रुजलं तर खूप मोठ्ठं नुकसान आहे याची जाणीव मला तरी होतेच. खरंच प्रत्येक गोष्टीत काही अर्थ नसतोच का? की आपण त्याचा पूर्ण अभ्यास न करताच असं ढोबळपणे म्हणत असतो. मुलांनो, जेव्हा काही अर्थ नाही असं म्हणता ना, तेव्हा त्याआधी अर्थ खरंच नाहीए का हे बारकाईने पाहायला आणि त्याची खातरजमा करायला विसरू नका. कारण काय होतं, आपणच विरुद्ध प्रकारचे विचार करतो आणि फशी पडतो. बघा हं, शालेय अभ्यासात अर्थ नाही असं आपण अनेकदा म्हणतो आणि आपणच मार्काची गणितं मांडत राहतो. जर अभ्यासात खरंच अर्थ नसेल तर का बरं आपण मार्कासाठी एवढी ढोरमेहनत करतो? ‘स्पर्धा, परीक्षा वगैरेंमध्येही अर्थ नाही,’ असं विधान चटकन केलं जातं. खरंच त्यात अर्थ नसेल तर यूपीएससी, एमपीएससीसाठी अनेक परीक्षार्थी का बरं जिवाचं रान करतात? राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यासाठी का बरं जीव ओततात लोक? टी.व्ही.वरचे रिअ‍ॅलिटी शोज् म्हणजे तरी काय असतं बरं? त्यांच्या विजेत्यांचं जाहीर कौतुक करतातच ना सगळे. आणि या मोठ्ठय़ा स्पर्धा, परीक्षांची सुरुवात खूप छोटय़ा छोटय़ा स्पर्धापासून होत असते. त्यामुळे त्या छोटय़ा स्पर्धा किंवा परीक्षांबाबत किंवा शालेय अभ्यासाबाबतही चटकन असं विधान करणं खरंच घातक असतं तुमच्या भविष्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं, एकदा जर का असा विचार म्हणजे ‘काही अर्थ नाही’ अशी सवय झाली ना तर प्रत्येक गोष्टच निर्थक वाटू लागेल, कशाचंच महत्त्व उरणार नाही. वा कशातच आनंद किंवा उत्साह वाटणार नाही आणि तुम्ही तुमचं मानसिक बळ गमावून बसाल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीत रसच वाटणार नाही. म्हणून आजपासून एवढं करा, प्रत्येक गोष्टीमधला अर्थ शोधत बसण्यापेक्षा आलेली प्रत्येक संधी घट्ट पकडायचा आणि तिचा आनंद घ्यायचा प्रयत्न करा. मग ती संधी अभ्यासाची असो, स्पर्धेची असो, सादरीकरणाची असो वा अजून कोणतीही असो. न जाणो, त्यातूनच तुमचं भलं होणार असेल! नाही तर एक अनुभव तरी नक्की गाठीशी जमा होईल. काय मग? साधाल ना हे?

joshimeghana231@yahoo.in

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal article about there is no point
First published on: 09-12-2018 at 00:03 IST