वर्गात सर ऑफ तासाला सांगत होते- ‘‘सुधा चंद्रन ही एक नृत्यांगना. एका अपघतात तिला तिचा उजवा पाय गमवावा लागला. तेव्हा ती पूर्ण खचली. पण तिच्यातील कलाकार तिला गप्प बसू देईना. कृत्रिम पायाच्याच मदतीने तिने आपले स्वप्न पूर्ण केले. पण त्यासाठी तिला भगीरथ प्रयत्न करावे लागले.’’
‘म्हणजे काय?’ मुलांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून सर सांगू लागले..
अयोध्येचा राजा सगर अश्वमेध यज्ञ करीत होता.
त्या वेळी इंद्राने अश्वमेधाचा अश्व पळवून ध्यानस्थ बसलेल्या कपिल ऋषींच्या मागे लपविला. सगराला केशिनी आणि सुमती अशा दोन बायका होत्या. सुमतीला साठ हजार पुत्र होते. सगराने त्या पुत्रांना घोडय़ाच्या शोधासाठी पाठविले. त्यांना कपिल ऋषींच्या मागे घोडा दिसला. त्यामुळे ऋषींनी तो चोरला असे त्यांना वाटले म्हणून त्यांच्यावर सगरपुत्रांनी हल्ला केला. तेव्हा ऋषींनी शाप देऊन त्यांना भस्म केले.
सगराच्या या साठ हजार पुत्रांना शोधण्यासाठी त्याने दुसरा मुलगा अंशुमन याला पाठविले. त्याच्याकरवी सगराला कळले, की ते कपिल ऋषींच्या शापाने दग्ध झाले आहेत आणि त्यांच्या रक्षेला गंगेचा स्पर्श झाला तरच त्यांना मोक्ष मिळणे शक्य होईल. गंगा ब्रह्मलोकांत कमंडलूमध्ये होती. अंशुमन त्याच्या हयातीत गंगेला पृथ्वीवर आणू शकला नाही. त्यानंतर अंशुमनपुत्र भगीरथ याने खूप प्रयत्न केले. त्याने हिमालयात जाऊन एक हजार वर्षे तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. भगीरथाने गंगेला पृथ्वीवर पाठविण्याची विनंती केली. ब्रह्मदेवाने ती मान्य केली. पण गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आल्यावर तिच्या रौद्र रूपामुळे पृथ्वी खचून जाईल म्हणून भगीरथ घाबरून गेला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, ‘‘तिला धारण करण्यास समर्थ असा एकच भगवान शंकर! तू शंकराला प्रसन्न करून घे.’’ पुन्हा भगीरथाने पायाच्या अंगठय़ावर उभे राहून अन्न-पाण्यावाचून कठोर तप केले व शंकराला प्रसन्न केले. शंकराने प्रसन्न होऊन तिला जटेत धारण केले, पण ती तेथेच अडकली. तेव्हा मग शंकराने जटेचा केस तोडून तिला वाट करून दिली. त्यानंतर गंगा भगीरथामागे येऊन सगरपुत्रांचा तिने उद्धार केला.
अशा प्रकारे अनेक सायासांनी भगीरथाने त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळवून दिला. म्हणून खूप प्रयत्नांती जेव्हा एखादे ध्येय गाठले जाते तेव्हा भगीरथ प्रयत्न केले असे म्हणतात.
मेघना फडके – memphadke@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagirath prayatna phrase meaning
First published on: 12-07-2015 at 01:03 IST