दोस्तांनो, यावेळी तुमच्या घरी कोणता गणपती आणला? शाडूच्या मातीचा की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा? तुम्ही तर ऐकलंच असेल की प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती नदी, तलावात विसर्जित केल्याने पाणी दूषित होतं. परिणामी तळाशी असलेल्या झऱ्यांना अडथळा येतो. या प्रदूषणाचे दुष्परिणाम सर्वच सजीवांना भोगावे लागतात. प्रदूषण म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला अ‍ॅनिमेटेड स्वरूपात बघायला मिळाले तर? http://mocomi.com/plaster-paris-idol-immersion-affect-environment/ या साइटला नक्की भेट द्या.
तुमची उत्सुकता वाढवणारी विविध प्रकारची माहिती http://mocomi.com येथे उपलब्ध आहे. लर्न (Learn) या भागात शास्त्र (जीव-भौतिक-रसायन इत्यादी), गणित, परिसर, सामान्य ज्ञान, इंग्रजी यासारखे अनेक विषय हाताळले आहेत. उदाहरणार्थ, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ यांसारखे उत्पात कसे निर्माण होतात हे सोप्या पद्धतीने समजावून सांगणारी अ‍ॅनिमेशन्स येथे उपलब्ध आहेत. काही अ‍ॅनिमेशन्ससोबत माहितीपर लेखही आहेत. अ‍ॅनिमेशन्सच्या शेवटी कुतूहल जागृत करणारे प्रश्नही विचारले आहेत. यावरून विषयाचे आकलन झाले आहे की नाही हे तर आपल्याला कळतेच, पण इंटरनेटवर अधिक माहिती शोधायला प्रोत्साहन मिळते. इंग्रजी विभागात अनेक वर्कशीट्स उपलब्ध आहेत- ज्या तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.
फन (ा४ल्ल) या भागात तुम्हाला गोष्टी वाचायला आणि बघायला मिळतील. आर्ट आणि क्राफ्टमध्ये रंग देण्यासाठी चित्र डाऊनलोड करून घेता येते. चित्र कसे काढायचे हे टप्प्याटप्प्याने शिकवणारे व्हिडीओदेखील आहेत. सहजपणे बनवता येतील अशा वस्तूंची कृती अगदी सोप्या शब्दांत फोटोंसहित दाखवली आहे.
गेम्समध्ये अनेक प्रकारची कोडी, प्रश्नमंजूषा इत्यादी अनेक खेळ आहेत. बहुतांशी खेळ हे शैक्षणिक दृष्टिकोनातून बनवले आहेत. जसे की, एका खेळात तुम्हाला चढता-उतरता क्रम लावायचा आहे. बरेचदा आपण अंक किंवा अक्षरे क्रमाने लावतो. या खेळात तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत. उदाहरणार्थ, गाडय़ांच्या आकारानुसार क्रम लावायचा आहे. अशा खेळांमुळे संकल्पना पक्क्या होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. तुमच्या बुद्धीला खाद्य आणि कलागुणांना वाव देणारी ही साइट तुम्हाला निश्चितच आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनाली रानडे -manaliranade84@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain game with animation
First published on: 20-09-2015 at 01:06 IST