लहान-थोर अशा सर्व व्यक्तींना साबणाच्या फुग्यांविषयी एक कुतूहल असतं. कारण या फुग्यांमध्ये दिसणारे विविध आकर्षक रंग आणि फुग्यांची हवेतील हालचाल. सुंदर, टिकाऊ फुगे शास्त्रोक्त पद्धतीने कसे बनवता येतील ते पाहू :
१)    १०० मिली लीटर पाण्यात सुमारे तीन ग्रॅम डिर्टजट पावडर विरघळवा किंवा साध्या द्रवरूप साबणामध्ये (लिक्विड सोप) पाणी घालून योग्य असा पातळ द्राव करून घ्या.
२)    साबणाचे फुगे जास्त वेळ टिकवायचे असतील तर साबणाच्या द्रावात थोडे ग्लिसरीन मिसळा. मिश्रण चांगले ढवळून एकजीव करून घ्या. एक-दोन दिवस तसेच ठेवून मग वापरा.
३)    फुगे फुगविण्यासाठी नळी : – सुमारे १ ते २ सेंटीमीटर व्यासाचा प्लास्टिक अथवा धातूचा पाइप (लांबी १० ते १५ सेंटीमीटर)घ्या. फुग्याचा आकार मोठा हवा असेल तर जास्त मोठय़ा व्यासाची आणि दुसऱ्या टोकाला निमुळती होत गेलेली नळी वापरा. धातूच्या पातळ तारेचे गोलाकार कडेसुद्धा वापरता येते. तसेच सलाइनची नळी व दंडगोलाकार प्लास्टिक कापून वापरता येते. (छायाचित्र पाहा)
पाण्याच्या अंगी ‘पृष्ठीय ताण’ हा गुणधर्म असतो; परंतु पाण्याचे फुगे टिकत नाहीत. पाण्यात साबण मिसळला तर ‘पृष्ठीय ताण’ कमी होतो व अत्यंत पातळ असा पडदा (thin film) तयार करता येतो. लांब दांडी असलेले धातूचे कडे (किंवा वेटोळे) साबणाच्या द्रावात बुडवून वर काढले तर अत्यंत पातळ असा पारदर्शक पडदा मिळतो. या पडद्यामध्ये एक पातळ दोरा (ज्याची लांबी कडय़ाच्या व्यासापेक्षा थोडी जास्त आहे व ज्याची दोन्ही टोके कडय़ाला बांधलेली आहेत) ठेवून एका बाजूची फिल्म बोटाने फोडली तर दोरा दुसऱ्या बाजूला वर्तुळ खंडाच्या आकारात खेचला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(आकृती १ पाहा)
तसेच दोऱ्याचे लहानसे वेटोळे मधे असताना त्यातील फिल्म फोडल्यास वेटोळे पूर्ण वर्तुळाकार धारण करते. (आकृती २ पहा) याचे कारण पृष्ठीय ताण होय.
साबणाच्या फुग्यांची काही वैशिष्टय़े :
१)    नळीने हवा भरताना फुगा हळूहळू ताणत मोठा होत जातो. पण मधेच हवा भरणे बंद करून नळीचे टोक मोकळे ठेवल्यास फुगा परत लहान होत जातो- कारण नळीतून हवा बाहेर पडते. ही हवा मेणबत्तीच्या ज्योतीवर सोडल्यास ज्योत विरुद्ध बाजूला झुकते. (आकृती ३ पाहा)
२)    साबणाचा फुगा चेंडूसारखा गोलाकारच (Sphere) धारण करतो. कारण साबणाच्या द्रावणाचा पडदा (Film) सर्व दिशांनी सारखा ताणलेला असतो. फुग्याच्या आतील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा थोडासा जास्त असतो, पण पृष्ठीय ताणामुळे हा दाबांमधील फरक तोलून धरला जातो.
३)    साबणाचा फुगा फुगवताना फिल्मची जाडी कमीकमी होत जात़े, म्हणजेच फुगा अधिकाधिक पातळ होत जातो. मजेची गोष्ट म्हणजे जसजसा फुग्याचा व्यास वाढत जातो तसतसा आतील व बाहेरील दाबांमधील फरक कमीकमी होत जातो. रबरी फुगा व साबणाचा फुगा यांमधील हा एक मुख्य फरक समजायला थोडा कठीण आहे. त्यासाठी पुढील प्रयोग स्वत करून पाहा:
 आकाराची काचेची नळी घेऊन तिच्या दोन टोकांवर सुमारे ६ सेंटीमीटर लांबीच्या रबरी नळ्या घट्ट बसवा. (आकृती ४ पहा) प्रथम एका रबळी नळीचे टोक साबणाच्या द्रावणात बुडवून वरच्या नळीतून हवा भरताना दुसरे टोक बोटाने बंद करून ठेवा. एक मध्यम आकाराचा फुगा तयार झाल्यावर दुसरे
टोक साबणाच्या द्रावणात बुडवून बाहेर काढा व परत हवा भरा; म्हणजे दोन्ही फुगे फुगू लागतील. (पहिला फुगा मोठा असेल)
आता हवा भरणे बंद करून वरच्या नळीचे तोंड बोटाने बंद करा आणि काय घडते त्याचे निरीक्षण करा. काय घडेल असे विचारल्यास बहुतांश व्यक्ती असेच सांगतात की मोठा फुगा लहान होईल व लहान फुगा मोठा होऊन शेवटी दोन्ही फुगे समान व्यासाचे होतील, पण हे उत्तर चूक आहे.
प्रत्यक्षात काय घडते ते स्वत: प्रयोग करून पाहा व त्यामागील कारण शोधा.
साबणाच्या फुग्यांऐवजी रबरी फुगे लावून हाच प्रयोग करून पाहा.  साबणाच्या फुग्याला सुई टोचली किंवा नुसत्या बोटाने स्पर्श केला तरी फुगा फुटतो. परंतु एक मोठी सुई किंवा दाभण तुम्ही साबणाच्या फुग्यात घालून आर-पार बाहेर काढलात तरी फुगा फुटणार नाही, फक्त त्यासाठी तुम्ही सुई किंवा दाभण खूप वेळ आधीपासून साबणाच्या द्रावणात बुडवून ठेवणे आवश्यक आहे. छायाचित्र १ मध्ये स्टेनस्टीलची पट्टी साबणाच्या फुग्यामधून आरपार काढून दाखवली आहे.
काही जादूगार रबरी फुग्यातून मोठी सुई आरपार घालून दाखवतात, पण त्यासाठी रबरी फुग्याच्या त्या भागावर पारदर्शक चिकटपट्टी (सेलोटेप) आधीच चिकटवलेली असते. साबणाच्या फुग्यांच्या विविध करामती करता येतात. (छायाचित्र २ पहा) 

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bubbles soap
First published on: 18-08-2013 at 01:02 IST