पौर्णिमेचा दिवस होता. आपल्या पूर्ण तेजाने झळकत चांदोबा मोठय़ा दिमाखात आकाशात दाखल झाला. आज पूर्ण रात्रभर आपल्या तेजाने पृथ्वीला न्हाऊ घालायचे, या विचाराने चांदोबाला खूप आनंद होत होता. इतक्यात एक ढग त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘काय रे, आज इतक्या खुशीत दिसतोस?’’
‘‘हो, आज पौर्णिमा ना! आज मी पूर्ण तेजाने पृथ्वीवासीयांसमोर झळकणार म्हणून..’’ चांदोबा म्हणाला.
‘‘छे! आज कुठला तू पूर्ण तेजाने झळकायला?’’ ढग चांदोबाला खिजवत म्हणाला, ‘‘मी तर पृथ्वीवर असं ऐकलं की तुला आज ग्रहण लागणार आहे! तो बघ, तुझ्या चेहऱ्याच्या एका कडेला काळा डाग दिसायलासुद्धा लागला आहे. थोडय़ाच वेळात हा काळा डाग वाढत जाऊन तुझा पूर्ण चेहरा झाकून टाकेल. मग कसला तू तेजस्वी दिसणार?’’
चांदोबाला डिवचून ढग निघूनही गेला. पण ढगाचे बोलणे ऐकून चांदोबा मात्र अस्वस्थ झाला. त्याने पटकन आरशात डोकावून पाहिले. खरोखरच त्याच्या चेहऱ्यावर काळा डाग दिसत होता. चांदोबा भांबावून गेला.
‘‘काय करावं बरं?’’ चांदोबाला काही सुचेना. तो स्वत:शीच विचार करत राहिला, ‘‘ढग म्हणत होता की त्यानं पृथ्वीवर ऐकलं की ग्रहण लागणार आहे. तर मग कोणाशी तरी बोलून खात्री करून घेऊ या..’’
या विचारासरशी चांदोबाला हायसे वाटले. त्याने आपला मोबाइल उचलला आणि नील आर्मस्ट्राँगला फोन लावला. नील आर्मस्ट्राँगशी चांदोबाची विशेष दोस्ती होती. पृथ्वीवरून खास चांदोबाला भेटायला तोच तर पहिल्यांदा गेला होता! त्याच्याशी बोलल्यावर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, याची चांदोबाला खात्री होती.
‘‘हॅलो, मी नील आर्मस्ट्राँग बोलतोय,’’ पलीकडून आपल्या मित्राचा आवाज ऐकताच चांदोबाला बरे वाटले.
‘‘अरे, तुला आज मुद्दाम फोन केला,’’ चांदोबा म्हणाला, ‘‘मला सांग, हे ग्रहण ही काय भानगड आहे?’’
‘‘अरे हो, आज खग्रास चंद्रग्रहण आहे!’’ नील आर्मस्ट्राँग म्हणाला.
‘‘म्हणजे नक्की काय आहे?’’ चांदोबाने विचारले.
‘‘आज पृथ्वीची सावली तुझ्यावर पडून त्यामुळे हळूहळू तू पूर्णपणे झाकोळला जाणार आहेस. तू पूर्णपणे झाकला जाणार म्हणून त्याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ म्हणतात,’’ आर्मस्ट्राँगने सांगितले.
‘‘बापरे!’’ चांदोबा घाबरून म्हणाला.
‘‘अरे, यात घाबरून जाण्यासारखं काही नाही,’’ आर्मस्ट्राँग चांदोबाला धीर देत म्हणाला, ‘‘ज्या-ज्या वेळी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका रेषेत येतात, त्या-त्या वेळी पृथ्वीची सावली तुझ्यावर पडते आणि पृथ्वीवरचे लोक चंद्राला ग्रहण लागलं आहे, असं म्हणतात,’’ आर्मस्ट्राँगने समजावून सांगितले.
‘‘मग ज्या वेळेला पृथ्वीवरचे लोक सूर्यग्रहण आहे, असं म्हणतात त्या वेळेला पृथ्वीची सावली सूर्यावर पडते का?’’ चांदोबाला प्रश्न पडला.
चांदोबाचा भाबडेपणा पाहून आर्मस्ट्राँगला हसू आले. तो म्हणाला, ‘‘सूर्यावर पृथ्वीची सावली पडण्याइतका ना तू तेजस्वी आहेस, ना सूर्य फिका! सूर्य आहे स्वयंप्रकाशी! त्यामुळे त्याच्यावर सावली पडण्याचा प्रश्नच येत नाही. तू आहेस परप्रकाशी. सूर्याचा तुझ्यावर पडणारा प्रकाश तू परावíतत करतोस. म्हणून तू तेजस्वी दिसतोस.’’
आर्मस्ट्राँगचे बोलणे ऐकून चांदोबा आणखीनच हिरमुसला आणि त्याचा चेहरा अधिकच काळवंडला. त्याला धीर देत आर्मस्ट्राँग म्हणाला, ‘‘सूर्यग्रहण लागतं तेव्हा काय होतं ते तुला पाहायचं आहे ना? मग समोर सूर्याकडे बघ. सूर्य पृथ्वीआड गेल्यामुळे तुला तो झाकला गेलेला दिसेल. म्हणजेच तुझ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज सूर्यग्रहण आहे.’’ चांदोबाला समजावून सांगत आर्मस्ट्राँग पुढे म्हणाला, ‘‘पृथ्वीवर चंद्रग्रहण असतं त्या वेळी चंद्रावर सूर्यग्रहण असतं. हवं तर तू स्वत: पाहून खात्री करून घे.’’
चांदोबाने समोर पाहिले. खरोखरच सूर्य पृथ्वीच्या आड लपताना दिसत होता. तिच्याकडे पाहत चांदोबा म्हणाला, ‘‘अरे, पण मी तर आज पूर्णपणे झाकला जाणार आहे. आणि इथे मला सूर्याचा काही भाग  दिसतो आहे. सूर्य काही पूर्णपणे झाकला गेलेला नाही.’’
आर्मस्ट्राँग म्हणाला, ‘‘अरे, ज्या वेळी तू पूर्णपणे झाकला जाशील त्या वेळी तुलाही सूर्य पृथ्वीआड दिसेनासा होईल.’’
‘‘पण मग,’’ चांदोबाने पुढची शंका विचारली, ‘‘पृथ्वीवर ज्या वेळेला सूर्यग्रहण असतं त्या वेळेला मला काय दिसेल?’’
‘‘त्या वेळी चंद्रावर पृथ्वीग्रहण दिसेल.’’
‘‘पृथ्वी कोणाच्या आड झाकली जाते?’’ चांदोबाने आश्चर्याने विचारले.
‘‘पृथ्वी कोणाच्या आड झाकली जात नाही. पृथ्वीवर तुझी सावली पडते,’’ आर्मस्ट्राँगने उत्तर दिले.
‘‘अच्छा, म्हणजे जिच्याभोवती मी फिरतो ती पृथ्वीसुद्धा चक्क परप्रकाशित आहे तर!’’ चांदोबा उद्गारला.
‘‘हो तर! आपल्या अख्ख्या सूर्यमालेत सूर्य वगळला तर बाकी सगळे परप्रकाशीच!’’ आर्मस्ट्राँग म्हणाला.
‘‘म्हणजे चमकदार म्हणून भाव खाणारा हा शुक्र, स्वत: खूप मोठा असणारा गुरू, आपल्या लालसर प्रकाशाने उठून दिसणारा मंगळ हे सगळेच परप्रकाशित आहेत तर!’’ चांदोबा उद्गारला. आपल्यासारखे खूप जण परप्रकाशी आहेत हे कळल्यावर चांदोबाचा चेहरा थोडा उजळला.
तेवढय़ात त्याला पृथ्वीआड लपलेला सूर्यही दिसायला सुरुवात झाली. ‘‘अरेच्या! आता पुन्हा सूर्य दिसायला सुरुवात झाली की!’’ चांदोबा उत्साहाने म्हणाला.
‘‘हो, आता पृथ्वीची सावली तुझ्या चेहऱ्यावरून बाजूला जायला लागली आहे. त्यामुळे पृथ्वीवरचं चंद्रग्रहण आणि चंद्रावरचं सूर्यग्रहण संपून तुझा चेहरा नेहमीप्रमाणे उजळणार आहे,’’ आर्मस्ट्राँगने ग्वाही दिली. आर्मस्ट्राँगचे बोलणे ऐकून चांदोबा खूष झाला.
आर्मस्ट्राँगशी बोलण्यात बराच वेळ गेला होता. चांदोबाने आरशात पाहिले. आपले पूर्ण तेजस्वी रूप पाहून चांदोबाला खुद्कन हसू आले आणि त्याच वेळेला पृथ्वीवासीयांनीही चंद्रग्रहण सुटल्याचा जल्लोष केला.