तुम्ही सगळे लहान मुलांसाठी असलेली पुस्तकं, मासिकं वाचत असणार, हो ना! वाचायला तुम्हाला आवडतं, मग आता ब्लॉग वाचायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल, ‘ते ब्लॉगब्लिग आई-बाबा वाचतात, त्यांच्या गप्पांमध्ये कधीतरी ब्लॉगर्सबद्दल चर्चा ऐकतो आम्ही, पण ते आमच्यासाठी नसतं.’

ब्लॉगिंग करणारे फक्त मोठेच असतात असं मुळीच नाहीए. जगभर अनेक छोटी मुलं ब्लॉगिंग करतात. आणि त्यांच्या ब्लॉग्जना जगभर प्रचंड प्रतिसाद मिळतो. तुमच्यासारखीच छोटी मुलं, इतर मुलांसाठी लिहितात. यात अनुभव, त्यांच्या ट्रिप्स, शाळेतल्या गमतीजमती, त्यांची निरीक्षणं, त्यांनी केलेले पदार्थ आणि बरंच काही असतं. आजच्या भागात अशाच काही चिमुरडय़ा ब्लॉगर्सची ओळख करून देणार आहे.

मार्था पेने ही तुमच्यासारखीच शाळेत जाणारी चिमुरडी स्कॉटिश मुलगी आहे. आज तिच्या ब्लॉगला जवळपास १० दशलक्ष हिट्स मिळालेले आहेत. काय लिहिते मार्था? तर तिच्या शाळेतल्या गमतीजमती, तिचे अनुभव, शाळेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबद्दल! मुळात ती फूड ब्लॉग प्रकारातलं लिहिते. ३० एप्रिल २०१२ मध्ये शाळेच्या एका प्रॉजेक्टसाठी तिने लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा ब्लॉग तयार झाला. तर आठ वर्षांची बेस्टी लू ‘द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ बेस्टी लू’ हा ब्लॉग चालवते. तिसरीतल्या बेस्टीला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यातूनच मग ती लिहायला लागली. मनातले विचार लिहावेत असं तिला वाटलं आणि सुरुवात झाली. मार्थाचे आई-बाबाही ब्लॉगर्स आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचाही तिला बराच फायदा होतो. ती तिच्या ट्रिप्सबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल लिहिते, फोटो शेअर करते. बेस्टी कविताही लिहिते. त्याही तिच्या ब्लॉगवर आहेत.

जगभर जी मुलं ब्लॉग्स लिहितात, ती सगळी कविता, अनुभव, ट्रिप्सबद्दल लिहितात असं नाहीए बरं का! दक्षिण लंडनमध्ये राहणारी मायलो मॅनिंग १० वर्षांची होती, जेव्हा तिनं आईला विचारलं की ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला सपोर्ट करणारा राजकीय ब्लॉग सुरू करता येईल का?’ देशात चालू असलेल्या राजकीय घडामोडींविषयी तिला जे काही समजलंय किंवा त्याविषयी जे तिला वाटतंय ते लिहिण्याची मायलोला इच्छा होती. त्यातूनच एप्रिल २०१० मध्ये तिचा LIBDEMCHILD हा ब्लॉग सुरू झाला. आज मायलो १८ वर्षांची आहे. हाच ब्लॉग ती आता ‘लिबरल गर्ल इज्ड १८’ या नावाने चालवते. गेली आठ वर्ष ती राजकीय ब्लॉग लिहिते आहे. तरुण पिढीला राजकारणी, राजकीय घडामोडींविषयी काय वाटतं, हे समजून घेण्यासाठी अनेक मोठेही तिचा ब्लॉग फॉलो करतात. सध्या ती किंग्स कॉलेजमधून राजकारण, तत्त्वज्ञान आणि कायदा यांचा अभ्यास करते आहे. ही तीन मुलं फक्त उदाहरणं आहेत. गुगलवर सर्च केलंत तर ब्लॉगिंग करणाऱ्या अनेक मुलांची माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यांचे ब्लॉग्स तुम्ही वाचू शकता. फॉलो करू शकता. भारतातही आता हळूहळू मुलांच्या ब्लॉगिंगची सुरुवात होते आहे. त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या गॅजेटचा वापर जगभरातल्या मुलांचे ब्लॉग वाचत त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी करता येऊ  शकेल. मग, भरपूर वाचा, लिहा, व्यक्त व्हा!

रेड अलर्ट

बहुतेक सगळ्या ब्लॉगमध्ये प्रतिक्रिया द्यायला जागा असते. तुम्ही समजा एकदा ब्लॉग नियमित वाचत असाल आणि त्यावर प्रतिक्रिया लिहीत असाल तर इतर वाचकांशी तुमची मैत्री होते. म्हणजेच जगभरातल्या मुलांशी आणि मोठय़ांशीही तुम्ही कनेक्ट होता. गप्पा मारता. ही मैत्री छानच आहे, पण अशा मैत्रीचे काही वेळा धोकेही असतात. त्यामुळे नव्याने झालेल्या ऑनलाइन मित्र-मैत्रिणींना लगेच तुमचे वैयक्तिक तपशील सांगू नका. त्यांच्याविषयी आई-बाबांना सांगा. तुमच्या चॅटिंगमध्ये तुम्हाला काही खटकलं असेल तर त्याविषयी आई-बाबांशी मोकळेपणाने बोला. म्हणजे आवश्यक असेल तर ते तुम्हाला मदत करू शकतील.

  • मार्था पेनेचा ब्लॉग वाचण्यासाठी : http://neverseconds.blogspot.in/
  • बेस्टी लूचा ब्लॉग वाचण्यासाठी : http://betsylouadventures.blogspot.in/
  • मायलो मॅनिंगचा ब्लॉग वाचण्यासाठी: http://libdemchild.blogspot.in/p/about-me.html

– मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)