सार्थकचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. वाढदिवसाची पार्टी संपल्यावर सगळे मित्रमैत्रिणी जाताच सार्थक घाईनं भेटवस्तू बघायला लागला.
‘‘सार्थक, उद्या सुट्टी आहे. आरामात आपण सगळ्या भेटवस्तू उघडू…’’ आईनं असं म्हटलंही. पण त्याला काही दमधीर नव्हता. त्यानं गिफ्ट पेपर टराटरा फाडायला सुरुवात केली. आईला ते काही आवडलं नाही.
‘‘सार्थक, अरे हळू उघड भेटवस्तू. कसे फाडतो आहेस ते गिफ्ट पेपर? अलगद काढ बरं…’’ आई त्रासिकपणे म्हणाली.
आई रागवेल म्हणून सार्थक भेटवस्तू हळूहळू बाहेर काढू लागला. भेटवस्तूत एक पुस्तकही आलं होतं. ते सार्थकनं बाजूला ठेवलं. ते बघून आई म्हणाली, ‘‘अरे व्वा! किता छान! कोणी दिले रे?’’
‘‘आपल्या समोरच्या काकूंनी. पुस्तक कशाला द्यायचं ना…’’ नाराजीनं सार्थक म्हणाला.
‘‘आता तू मोठा झालास ना! पुस्तकं वाचायला हवीत. कोणतं पुस्तक आहे बघूया तर…’’ असं म्हणत आईनं पुस्तकावरचा कागद काढला. आत ‘श्यामची आई’ पुस्तक होतं.
‘‘सार्थक, खूप छान पुस्तक आहे. तुला आवडेल, वाच तू. ’’
‘‘आई, पुस्तक वाचायला घेतलं की झोप येते. पुस्तक वाचणं म्हणजे बोअरिंग काम.’’
‘‘वाचलं तर तुला कळेल ना! वाचून दाखवू का तुला?’’
‘‘नको नको… आता मी प्रेमनं दिलेल्या गाडीसोबत खेळणार आहे,’’ असं म्हणत सार्थक गाडी इकडून तिकडे पळवू लागला. सार्थकला वाचनाची गोडी कशी लावावी याचा विचार करत आईनं पुस्तक चाळलं व कपाटात ठेवून दिलं.
एक दिवस सार्थक शाळेतून घरी आल्याआल्या पुस्तकांच्या कपाटाकडे धावत गेला. आईला जरा आश्चर्य वाटलं. तो एक एक पुस्तक काढून बघू लागला.
‘‘सार्थक, काय शोधतो आहेस?’’
‘‘आई, त्या दिवशीचं ते ‘श्यामची आई’ पुस्तक कुठे आहे?’’
‘‘कशाला हवं तुला?’’
‘‘मला वाचायचं आहे.’’
‘‘खरंच की काय!’’ आई जरा आनंदानंच म्हणाली.
‘‘आज मराठीच्या बाईंनी वर्गात सगळ्यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा. कोणीच काही बोलेना. मला ‘श्यामची आई’ हे नाव आठवलं. मी बाईंना सांगताच त्यांनी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यांनी मला पुस्तक वाचलं का विचारलं.’’
‘‘मग तू काय उत्तर दिलं बरं?’’
‘‘मी त्यांना म्हणालो, मी वाचणार आहे.’’ तेव्हा बाई म्हणाल्या, ‘‘तू या चार दिवसांत ते पुस्तक वाच आणि का आवडलं ते लिहून आण.’’
‘‘पण तुला तर झोप येते ना… तू सांगायचं बाईंना, मला जमणार नाही.’’ आई मिश्कीलपणे हसत म्हणाली.
‘‘आई, असं कसं बाईंना सांगणार. त्यांनी सांगितलं आहे तर वाचायलाच हवं. कुठे आहे ते पुस्तक?’’ गंभीरपणे सार्थक म्हणाला.
‘‘सार्थक, काल आजीनं घेतलं होतं बहुतेक.’’
सार्थक धावत आजीकडे गेला. आजी पुस्तक वाचत होती. ‘‘आजी, मला हे पुस्तक वाचायला हवं आहे. देशील का?’’
‘‘अगं बाई! किती गुणी बाळ! चक्क पुस्तक वाचायला मागतं आहे.’’ गालगुच्च्या घेत आजीनं आनंदानं पुस्तक दिलं. सार्थक खेळायला न जाता त्या दिवशी पुस्तक वाचत बसला. तो वाचता वाचता जे समजत नव्हतं ते आईला विचारत होता. पुस्तक वाचण्यात तो रमून गेला. आईनं रात्री जेवायला हाक मारली तरी सार्थक वाचनातच रमला होता. रात्री झोपताना तो श्यामविषयी व त्याच्या आईविषयी बोलत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेतून परत आल्यावर त्यानं राहिलेलं पुस्तक वाचायला सुरुवात केली. तीनचार दिवसांत त्यानं पुस्तक वाचून संपवलं. ‘मला आवडलेलं पुस्तक’ असा निबंध लिहिला व बाईंना दिला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात बाईंनी तो निबंध सार्थकला वाचायला सांगितला. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं. सार्थकला खूप छान वाटलं. घरी आल्या आल्या सार्थकनं शाळेत झालेलं कौतुक आईला व आजीला उत्साहानं सांगितलं.
आजीनं सार्थकला प्रेमानं जवळ घेत म्हटलं, ‘‘बघतिलंस, तू पुस्तक वाचतोस याचं सगळ्यांना किती कौतुक वाटलं. अरे, वाचनानं माणूस घडतो. समाजात होऊन गेलेल्या अनेक मोठ्या माणसांनी वाचन केल्यामुळेच ते ज्ञानी झाले. संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे, ‘वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्। वार्धक्ये दु:खहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम्।।’ याचा अर्थ असा आहे की, चांगले वाचन बालपणी ज्ञान देते, तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करते आणि वृद्धपणी दु:खे दूर करते. म्हणजेच वाचन सगळ्यांसाठी हितकारक आहे.’’
‘‘आजी, तू म्हणतेस ते मला आता पटायला लागलं आहे. मी बाबांना नवीन पुस्तकं आणायला सांगणार आहे. बरं झालं काकूंनी मला पुस्तक दिलं. त्यामुळे मला वाचनाचं महत्त्व तरी कळलं. आता मी माझ्या मित्रांच्या वाढदिवसाला पुस्तकच भेट म्हणून देणार. त्यांनाही पुस्तकं छान असतात हे कळायला हवं.’’
सार्थकच्या बोलण्यानं आईला फार आनंद झाला. त्याचा गालगुच्च्या घेत ती आजीला म्हणाली, ‘‘चला, माझ्या बाळाला ‘वाचाल तर वाचाल’ हे लवकर कळल्यामुळे माझा जीव एकदाचा भांड्यात पडला.’’
‘‘आई, म्हणजे आता मी नक्की वाचणार ना…’’
‘‘ हो तर… ’’ आई व आजी एकदम हसत म्हणाल्या. मग काय सार्थकनं पालुपदच चालू केलं, ‘‘वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल…’’
mukatkar@gmail.com
