फूल म्हणाले, ‘‘आभाळा
रंग माझे पहा जरा!’’
आभाळाला निळाईचा
गर्व होता खराखुरा.

फूल वदले, ‘‘निळ्या नभा
तुझ्या खाली मीही उभा
रव्यातुनी येतो मी
पानांमधून गातो मी.’’

आभाळ म्हणाले, ‘‘तू तर छोटा
तुझ्याहुनही किती मी मोठा!
भव्य मंडप मी सृष्टीला
तू न दिसतो दृष्टीला!’’

फूल झाले खट्टू मनी
चित्त लागेना रानीवनी
रडत बसले स्वत:शी
बोलेना ते पाकोळीशी

फुलास भेटण्या वारा आला
सुगंध चौफेर घेऊन गेला
ढगदेखील भरून आले
नाराज फुलाला पाणी दिले.

फुलाशी खेळण्या सूर्य आला
ढगाआडून तो डोकावला
आभाळाला फुल लगडले
इंद्रधनुचे चित्र उमटले.

इंद्रधनू ते फुलास दिसले
रंग पाहुनी गालात हसले
सुगंध येतो हा कुठूनी?
आभाळ म्हणाले आनंदूनी.

आभाळाचा विरला तोरा
फुलास जेव्हा भीडला वारा
वाकून थोडे खाली झुकले
फुलाचे त्याने पापे घेतले.

डॉ. कैलास दौंड