मेघश्री दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही संशोधकांच्या गोष्टी ऐकता तेव्हा अप्रूप वाटत असेल ना? पण खरं सांगू का, संशोधन करायला खूप शिकायला हवं, मोठं व्हायला हवं, असं बिलकूल नसतं. हवी असते ती इच्छा, कल्पनाशक्ती आणि प्रयोगांची आवड.

आता ब्रेलचीच गोष्ट बघा. अंध व्यक्तींना केवळ स्पर्शाने वाचता येईल अशी ही ठिपक्यांची लिपी लुई ब्रेलने तयार केली अवघ्या पंधराव्या वर्षी. तर याच ब्रेल लिपीत छपाई करणारं अत्यंत स्वस्त यंत्र बनवलं ते शुभम बॅनर्जी या तेरा वर्षांच्या मुलाने! एरवी सव्वा लाख रुपयांहून अधिक किंमतीचं हे यंत्र शुभमच्या संशोधनामुळे केवळ पंचवीस हजारांच्या आत उपलब्ध झालं. लेगो वापरून केलेल्या या प्रिंटरला २०१४-२०१५ मध्ये अनेक पारितोषिकं मिळाली आहेत.

इजिप्तमधली फयाद ही सोळा वर्षांची शाळकरी मुलगी. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन मिळवणारी रासायनिक प्रक्रिया तिने विकसित केली आहे. गाडय़ांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित हवेतला कार्बन कमी करण्याचं संशोधन करताना परम जग्गी फक्त सोळा वर्षांचा होता. पुढे त्याने या संशोधनाचं पेटंट घेतलं आणि आता तर त्याची स्वत:ची कंपनी आहे.

सोपं उपकरण वापरून दूषित पाण्यातून फॉस्फरस वेगळा करून दाखवणारी पेज ब्राऊन, नवीन औषधांच्या चाचणीसाठी योग्य प्रोटीन स्पॉट्स शोधणारा अमोल पंजाबी, आगीत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी इमर्जन्सी पॉड बनवणारी अलेक्सिस लुईस, अस्थमाचं निदान करणारं स्वस्त उपकरण तयार करणारी माया वर्मा, प्लास्टिक रिसायकिलगवर काम करणारी मारीया ग्रिमेट, एबोलाची सोपी चाचणी विकसित करणारी ऑलिविया हॅविसी, हे सगळे संशोधक अठरा वर्षांच्या आतले आहेत.

हे छोटे संशोधक उत्साही असतात. आजूबाजूला कुतूहलाने पाहतात. नवनव्या युक्त्या लढवतात. तुमच्यापकी कित्येकांच्या डोक्यात अशा कल्पना येत असतील. तुमचे पालक-शिक्षक यांच्याशी नक्की बोला आणि या कल्पना प्रत्यक्षात कशा आणता येतील याचाही विचार करा. आज या सदराचा समारोप करताना तुमच्यातल्या काही छोटय़ांनी पुढे अशाच मोठय़ा करामती कराव्यात यासाठी खूप खूप शुभेच्छा!

meghashri@gmail.com (समाप्त)

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little ones big tricks
First published on: 23-12-2018 at 00:17 IST